दुबई : टीम इंडियाचा एशिया कप-2022 चा प्रवास संपुष्टात आला आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले होते. दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही सामन्यात अर्शदीप सिंगने भारतासाठी शेवटची ओव्हर टाकली. मात्र पाकिस्तानविरुद्ध कॅच सोडल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये अर्शदीप सिंग हॉटेलमधून टीम बसमध्ये जातोय. त्याचवेळी एक व्यक्ती त्याला 'गद्दार' म्हणतो. इतकंच नव्हे तर कॅच सोडल्याबद्दल शिव्या देताना दिसतोय. यादरम्यान अर्शदीप सिंह बसमध्ये उभा राहतो आणि थोडा वेळ त्यांच्याकडे पाहतो आणि मग पुढे जातो.


ही व्यक्ती अपशब्द वापरत असताना एका क्रीडा पत्रकाराने त्याला फटकारलं. ते म्हणाले की, अर्शदीप भारतीय खेळाडू आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी असे शब्द वापरत आहात. 


त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडलं आणि टीमच्या बसपासून दूर नेलं. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात अर्शदीप सिंगचा एक झेल सुटला होता. पाकिस्तानच्या आसिफ अलीचा झेल सोडणं टीम इंडियाला महागात पडलं. शेवटी टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला.



या सामन्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपवर निशाणा साधण्यात आला होता, तरीही टीम इंडियाने अर्शदीप सिंगला पूर्ण पाठिंबा दिला. विराट कोहली, नंतर रोहित शर्माने उघडपणे सांगितले की, कॅच ड्रॉप होणं हा खेळाचा एक भाग आहे, अशा परिस्थितीत तुम्ही कोणालाही टार्गेट करू शकत नाही. खेळाडूंचं काम त्यांच्या चुकांमधून शिकणं, त्यावर काम करणं आणि पुढे जाणं आहे.