Mumbai Indians : गेल्या काही महिन्यांपासून इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर वादांच्या केंद्रस्थानी आहे. 2021 च्या हंगामानंतर हार्दिक पांड्याला फ्रेंचायझीने पुन्हा एकदा संघात घेतलं आहे. पांड्याने गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सने मात्र पंड्याला फक्त परत आणण्याचा निर्णयच घेतला नाही तर त्याला कर्णधार देखील केलं आहे. रोहित शर्माला बाजूला करत हार्दिकवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी फ्रेंचायझीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे. त्यातच आता मुंबई इंडियन्सने केलेल्या एका फोटोमुळे वातावरण आणखी तापलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या चार फिरकी गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाच्या घोषणेनंतर, आयपीएलच्या अनेक संघांनी त्यांच्याशी संबंधित खेळाडूंबद्दल पोस्ट शेअर केली आहे. मात्र, यावेळी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या फोटोशिवाय भारतीय संघाची फोटो शेअर केल्याने चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.


मुंबई इंडियन्सच्या पोस्टमधून रोहित शर्माचा फोटो गायब झाल्यानं चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. बीसीसीआयच्या घोषणेनंतर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंची नावे शेअर केली आहेत. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर दिसत आहेत. मात्र यामध्ये कर्णधार रोहित शर्मा नसल्याने मुंबईच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या मते, भारतीय संघाचा कर्णधार असल्याने रोहितचा फोटो तिथे वापरायला हवा होता.



'मला समजतं की इतर फ्रँचायझी त्यांच्या संघाच्या पोस्टमध्ये रोहितचा कर्णधाराचा चेहरा वापरत नाहीत, पण तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती,' असे एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. हे किती वाईट आहे. 'तुमच्या पोस्टरमध्ये रोहित कुठे आहे? तो राष्ट्रीय कर्णधार आहे. सर्वात वाईट प्रकार. या आयपीएलमध्ये तो वेगळ्या संघाकडून खेळला तर बरे होईल,' असेही एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच आयपीयल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तरी पण आता त्याला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर ते त्याला भारतीय कसोटी संघाच्या पोस्टरमध्येसुद्धा दाखवत नाहीत ज्यात तो भारतीय संघाचा कर्णधार आहे, असे आणखी एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.