पुण्यापाठोपाठ दिल्लीतल्या आयपीएल मॅचवरही संकट, हे आहे कारण
पुण्यापाठोपाठ आता दिल्लीमध्ये होणाऱ्या आयपीएल मॅचवरही संकट आलं आहे.
नवी दिल्ली : पुण्यापाठोपाठ आता दिल्लीमध्ये होणाऱ्या आयपीएल मॅचवरही संकट आलं आहे. फिरोजशहा कोटला मैदानातलं जुनं क्लब हाऊस मॅचच्या प्रसारणाची उपकरणं ठेवण्यासाठी वापरायला परवानगी दिली आणि काही दुर्घटना झाली तर त्याची जबाबदारी दक्षिण दिल्ली महापालिका आणि डीडीसीए यांची असेल, असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हंटलं आहे. जर जुन्या क्लब हाऊसचा वापर उपकरणं ठेवण्यासाठी करण्यात आला नाही तर २३ एप्रिलला दिल्लीत होणारा सामना आयोजित करणं शक्य नाही, असं डीडीसीएनं सांगितलं आहे.
काय म्हणाले न्यायमूर्ती
तुम्ही किंवा मी तज्ज्ञ नाही त्यामुळे परवानगी सरकारी यंत्रणांनाच द्यावी लागेल. त्यांना सगळी जबाबदारी घ्यावी लागेल. इमारत पडली, कोणतीही व्यक्ती जखमी किंवा मृत झाली तर याला तुम्ही जबाबदार असाल. मॅच तर होतच राहतील, असं न्यायमूर्ती राजीव शकधर म्हणालेत.
पुण्यात होणाऱ्या आयपीएल मॅचना दणका
पुण्यामध्ये होणाऱ्या चेन्नईच्या आयपीएल मॅचना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएला पुढील आदेश येईपर्यंत पवना धरणातून पाणी घेण्यास मनाई केली आहे. या संदर्भात एमसीएकडून जो करार न्यायालयात आज सादर करण्यात आला . या करारात पवनाचे पाणी एमसीए औद्योगिक वापरासाठी वापरणार असल्याचे म्हटले आहे .
हा करार चुकीचा असून पवनामधून घेण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर हा स्टेडियमच्या देखभालीसाठी न दाखवता औद्योगिक वापरासाठी दाखवण्यात आला असल्याचे आज मुंबई उच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे यावर निर्णय घेत उच्च न्यायालयाने एमसीए ला पाणी घेण्यास मनाई केली आहे.
चेन्नईचे सामने पुण्यात हलवले
आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमनं दोन वर्षानंतर पुनरागमन केलं. यानंतर चेन्नईत झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये आंदोलन झालं. कावेरीच्या पाणी प्रश्नावरून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियम बाहेर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे टॉस उशीरा पडला. तसंच मॅच सुरु झाल्यावर रवींद्र जाडेजा आणि फाफ ड्यू प्लेसिसवर मैदानात आंदोलनकर्त्यांनी बूटही फेकून मारला होता. या प्रकारानंतर चेन्नईत होणारे सगळे सामने पुण्यामध्ये हलवण्यात आले होते. कावेरीच्या पाणी प्रश्नावर लवादाची नियुक्ती व्हावी यासाठी तामीळनाडूमधले पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. अभिनेते रजनीकांत आणि कमल हसनही या प्रश्नावर रस्त्यावर उतरले होते.