Fifa Women World Cup च्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 1-0 ने धूळ चारत स्पेन विश्वविजेता ठरला आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतर मैदानात खेळाडूंचं सेलिब्रेशन सुरु असताना एक लाजिरवणारा प्रकार घडला, ज्यामुळे फक्त स्पेन नाही तर संपूर्ण जगभरात संतापाची लाट पसरली आहे. स्पेनची स्ट्रायकर जेनी हर्मोसोला स्पॅनिश एफए अध्यक्ष लुईस रुबियल्स यांनी सेलिब्रेशन करताना एक नाही तर 3 वेळा ओठांवर किस केला. लुईस रुबियल्स खेळाडूला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यानंतर संताप व्यक्त होत आहे. स्पेनच्या पंतप्रधानांनीही नाराजी जाहीर केली असून, माफी मागण्यास सांगितलं आहे. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना जिंकल्यानंतर खेळाडू मंचावर मेडल स्विकारत पुढे जात होत्या. यावेळी खाली स्पॅनिश एफएचे अध्यक्ष लुईस रुबियल्स इतरांसह खेळाडूंच्या अभिनंदनासाठी उभे होते. यादरम्यान ते प्रत्येक महिला खेळाडूला मिठी मारत, गालावर किस करत होते. यादरम्यान महिला खेळाडूही थोड्या अवघडल्यासारख्या दिसत होत्या. यावेळी स्पेनची स्टार खेळाडू जेनी हर्मोसो आली असता लुईस रुबियल्स यांनी तिलाही घट्ट मिठी मारली. यानंतर त्यांनी थेट ओठांवर किस केला. यादरम्यान त्यांनी जेनीला जबरदस्तीने घट्ट पकडून ठेवल्याचं दिसत आहे. 



लुईस फक्त इतक्यावरच थांबले नाहीत, तर 3 वेळा किस केल्यानंतर जेनी जाताना तिच्या पाठीवर हात मारतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यानंतर टीकेची झोड उठली आहे. स्पेनमध्ये संतापाची लाटच पसरली असून, देशाच्या पंतप्रधानांनीही दखल घेतली आहे. पंतप्रधान पेड्रो सांचेज (Pedro Sanchez) यांनी म्हटलं आहे की, "जे काही आपण पाहिलं आहे ते अस्वीकारार्ह आहे".



हर्मोसोला जेव्हा लुईस रुबियल्स यांच्या कृत्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने आपल्याला हे अजिबात आवडलं नाही असं मान्य केलं. 'मला हे आवडलं नाही, पण मी काय करु शकते,' अशी हतबलता तिने व्यक्त केली. 



लुईस रुबियल्स वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी स्पॅनिश संघांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप लागला होता. इतकंच नाही तर संघटनेच्या पैशांवर मजा मारत असल्याचा आरोपही लावण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणानंतर त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. 


पंतप्रधानांकडून टीका


पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी म्हटलं आहे की, "लुईस रुबियल्स यांनी फक्त माफी मागणं पुरेसं नाही. मला वाटतं हे फारच चुकीचं असून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे". वाद वाढू लागल्यानंतर लुईस रुबियल्स यांनी व्हिडीओ शेअर करत या घटनेप्रकरणी माफी मागितली होती. ते म्हणाले होते की "उत्साहाच्या क्षणी मनात कोणताही वाईट हेतू न ठेवता ते कृत्य करण्यात आलं होतं. आम्हाला ते नैसर्गिक आणि सामान्य वाटलं, पण बाहेर यामुळे वाद झाला. त्यामुळे मी माफी मागत आहे".