FIFA World Cup 2022 : लिओनेल मेस्सी... फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट... एखाद्या परीकथेचा गोड शेवट व्हावा, तसंच या फुटबॉल किंगच्या बाबतीत घडलं. कतारच्या स्टेडियमवर रंगलेल्या रोमहर्षक फुटबॉल फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर मात केली, तेव्हा मेस्सीचं सर्वात मोठं स्वप्न साकार झालं...आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्याचं... अर्जेंटिनानं जिंकलेला हा तिसरा वर्ल्ड कप...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यातरी चूरस पाहून मेस्सी जिंकणार की, एम्बाप्पेमधला बाजीगर? सगळ्या जगाचं लक्ष कतारच्या स्टेडियमवर लागलं होतं. अखेर अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्टिनेझ पुन्हा एकदा हिरो ठरला. पेनल्टी शूटआऊटचा हा थरार अर्जेंटीनाने 4-2 नं जिंकला आणि वर्ल्ड कपवर तिसऱ्यांदा अर्जेंटीनाचं नाव कोरलं. मेस्सीनं वर्ल्ड कप जिंकला आणि एमबापेनं तमाम फुटबॉल प्रेमींचं मन देखील. मेस्सी गोल्डन बॉलचा, तर एमबापे गोल्डन बूटचा मानकरी ठरला.


तब्बल ३६ वर्षांनी चॅम्पियन ठरलेली अर्जेंटिना... त्यामुळं न भूतो न भविष्यती असा जल्लोष साजरा झाला नसता तरच नवलच... ब्यूनस आयर्समधला हा जल्लोष... सेलिब्रेशनसाठी जणू अख्खा अर्जेंटिना देशच रस्त्यावर उतरला होता... केवळ अर्जेंटीनाच नव्हे तर जगभरात विखुरलेल्या मेस्सी फॅन्सनी आपल्या आनंदाला मोकळी वाट करून दिली. 


दरम्यान अगदी कोल्हापूरपासून ब्यूनस आयर्सपर्यंत या चाहत्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कारण मेस्सीनं जेतेपदानंतर केलेली नवी घोषणा. आपण एवढ्यात निवृत्त होणार नसल्याचं त्यानं जाहीर केल्यानं चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मेस्सी नावाचा हा सम्राट पुन्हा एकदा जग जिंकायला सज्ज झालाय. त्यामुळे आता मेस्सी 2026 चा देखील वर्ल्डकप खेळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटीनाचा विजय


सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेंटीनाने थरारक विजय मिळवलाय. फिफाच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेंटिनासाठी मेस्सी (Lionel Messi) आणि डी मारियाने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत विजयी आघाडी घेतली. तर अखेरीस अर्जेंटिनाने 4-2 (Argentina vs France) असा विजय साकारत तिस-यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.