कोलकाता : एखाद्याचं एखादं गुपित त्याच्या मृत्यूनंतर उघडकीस आलं तर... त्याची सुटका झालेली असते परंतु, इतरांना मात्र मोठा धक्का बसलेला असतो. असाच धक्का बसलाय भारताचे माजी फुटबॉलर पी. कन्नन (P. Kannan) यांच्या कुटुंबीयांना... भारताकडून १४ मॅच खेळणाऱ्या माजी फॉरवर्डचं दीर्घ आजारानंतर रविवारी निधन झालं. आणि त्यानंतर सुरु झाला त्यांच्या माजी पत्नी आणि सध्याच्या पत्नीमध्ये वाद... यामुळे इतर कुटुंबीयही गोंधळून गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पी. कन्नन याच्या कुटुंबात पत्नी एन्टोनिया आणि दोन मुली आहेत. परंतु, मृतदेह ताब्यात घेण्याची वेळ आली तेव्हा कन्नन यांची पहिली पत्नी बंगळुरूहून इथं दाखल झाली. आपल्या विवाहाचं प्रमाणपत्र दाखवून त्यांनी मृतदेह आपल्या ताब्यात सोपवण्यात यावा, असा दावा केला. 


यामुळे एन्टोनिया आणि विजय लक्ष्मी या कन्नन यांच्या दोन पत्नींमध्ये तब्बल तीन दिवस वाद सुरू होता. दोघींनी एकमेकींना खुलेआम शिवीगाळही केली. या दरम्यान कन्नन यांचा मृतदेह दमदमच्या गोरा बाजार शवदाह गृहात ठेवण्यात आला होता. 


धक्कादायक म्हणजे, वादादरम्यान पी. कन्नन यांची तिसरी पत्नी असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली. मात्र ही तिसरी पत्नी कोण? आणि ती कुठे राहते? हे मात्र उघड होऊ शकलं नाही. 


तीन दिवसांनंतर दक्षिण दमदमचे काऊन्सलर संजय दास यांनी, वाद सोडवण्यात आला असून एन्टोनिया यांच्या परवानगीसह पी. कन्नन यांची पहिली पत्नी मृतदेह बंगळुरूला घेऊन गेल्याचं सांगितलं. 



कोलकाताला राहणाऱ्या कन्नन यांच्या एन्टोनिया या पत्नीनं ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर मृतदेह बंगळुरूला हलवण्यात आला. पण याचा एन्टोनिया यांना चांगलाच धक्का बसलाय. 'आम्ही १९७५ मध्ये लग्न केलं होतं. इतकी वर्ष आम्ही सोबत राहिलो. ते जेव्हा रुग्णालयात दाखल होते तेव्हा त्यांच्यासोबत मीच होते. मला त्यांच्या लग्नाबद्दल माहिती नव्हती' असं एन्टोनिया यांनी म्हटलंय. 


'मी शव सोपवलंय. ते जेव्हा जीवंत होते तेव्हा मी त्यांच्यासोबत होते. आता मृत्यूनंतर मृतदेहावर भांडण करण्यात काहीही अर्थ नव्हता' असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.