`तुला इतकं कळतं तर ऑस्ट्रेलियात लक्ष घाल,` गंभीरने सुनावल्यानंतर रिकी पाँटिंगनेही दिलं उत्तर, `जर माझ्यासमोर आलास...`
गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणजे एक काटेरी व्यक्तिमत्व आहे असं रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला आहे. तसंच गौतम गंभीरसह आपला थोडा इतिहास असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) संताप व्यक्त केल्यानंतर आपल्या अजिबात आश्चर्य वाटलं नसल्याचं ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला आहे. रिकी पाँटिंगने विराट कोहलीच्या फॉर्मवर टीका केली होती. 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्य़ा बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर त्याने ही टीका केली होती. न्यूझीलंडविरोधातील खराब फॉर्मनंतर विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांमध्ये रिकी पाँटिंगचाही समावेश आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधातील मालिकेत फक्त 93 धावा केल्या. घऱच्या मैदानावरील त्याचा गेल्या 7 वर्षातील सर्वात खराब फॉर्म होता.
आयसीसी पॉ़डकास्टमध्ये रिकी पाँटिगने विराट कोहलीने गेल्या 5 वर्षात फक्त तीन शतकं ठोकली असल्याकडे लक्ष वेधलं. विराट कोहलीने 5 वर्षात 60 कसोटी मालिका खेळल्या आहेत. "इतक्या कमी धावा केल्यानंतर दुसरा कोणताही आघाडीचा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसेल," असं रिकी पाँटिंग म्हणाला.
गौतम गंभीरने पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रिकी पाँटिगने केलेल्या टीकेवर भाष्य केलं. "पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटतं की त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा," असं तो म्हणाला. "महत्त्वाचे म्हणजे, मला विराट आणि रोहितबद्दल कोणतीही चिंता नाही. ते आश्चर्यकारकपणे फार उत्तम खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी बरेच काही साध्य केले आहे आणि भविष्यातही ते बरेच काही साध्य करत राहतील," असाही विश्वास त्याने व्यक्त केला.
रिकी पाँटिंग झाला व्यक्त
रिकी पाँटिंगने चॅनेल सेव्हनशी संवाद साधताना गौतम गंभीर फार काटेरी व्यक्तिमत्व असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपला त्याच्यासह क्रिकेट खेळताना इतिहास असल्याचंही सांगितलं. "मी म्हटलं होतं की, मला चिंता आहे (त्याच्या फॉर्मबद्दल)," असं रिकी पाँटिंगने 7NEWS ला सांगितलं. पुढे तो म्हणाला, "पण जर तुम्ही विराटला विचारलं, तर मला खात्री आहे की त्यालाही चिंता असेल. गेल्या काही वर्षात केले आहे त्याप्रमाणे तो शतकं करु शकला नाही".
"कोणत्याही प्रकारे मी टोला लगावला नव्हता. तो ऑस्ट्रेलियात चांगला खेळला असून, पुन्हा फॉर्ममध्ये येईल असं मी सांगितलं. त्यामुळे, छोट्या छोट्या गोष्टींचा मुद्दा कसा होतो हे आश्चर्यकारक आहे, पण तो एक उत्तम खेळाडू असून यापूर्वी ऑस्ट्रेलियात चांगला खेळला होता. गौतम गंभीरची प्रतिक्रिया पाहून मला आश्चर्य वाटलं. तो खूपच काटेरी स्वभावाचा आहे, त्यामुळे त्याने परत काहीतरी सांगितले तर मला आश्चर्य वाटणार नाही," असंही तो म्हणाला. पाँटिगने पुढे कबूल केलं की, कसोटी मालिकेदरम्यान जक गंभीर त्याच्यासमोर आला तर हस्तांदोलन करेल. पण असं होईल अशी आशा नसल्याचंही त्याने सांगितलं.