विराट आणि भारतीय टीमबाबत अपशब्द वापरल्याने पॉटिंग भडकला
पॉटिंगने आपल्याच देशातील लोकांना सुनावलं
सिडनी : क्रिकेट सामन्यादरम्यान अनेकदा स्थानिक नागरिकांकडून विरुद्ध टीमबाबत अपशब्द काढले जातात. आस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरीजदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंबद्दल अपशब्द वापरले. याबाबत अनेकदा असं न करण्याचे आवाहन करुनही ही गोष्ट सुरुच आहे. आपल्या टीमच्या खराब कामगिरीमुळे प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंवर राग काढला. यामध्ये विराट कोहलीला सर्वाधिक टार्गेट केलं जात आहे. आता यावर आस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने राग व्यक्त केला आहे.
वेबसाईट 'ईएसपीएन'च्या रिपोर्टनुसार, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये गुरुवारी मैदानावरुन परत जात असताना काही जणांनी त्य़ाचं कौतुक केलं तर काही जणांनी त्याच्याबद्दल अपशब्द वापरले. पॉटिंगने ही गोष्ट लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.
पॉटिंगने यावर प्रतिक्रिया देतांना म्हटलं की, 'जर हे निंदा करणे आहे तर ते खूप लज्जास्पद आहे. मी पर्थमध्ये देखील हिच गोष्ट म्हटली होती. कृपया दुसऱ्या खेळाडूंचा सन्मान करा.'
क्रिकेट आस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स यांनी देखील या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'मला ही गोष्ट आवडत नाही. आपण आस्ट्रेलियाच्या गौरवाबाबत बोलतो. मी प्रेक्षकांना आग्रह करतो की या खेळाचा सन्मान करा. आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा सन्मान करा. त्यांना आपल्या देशाचा चांगला अनुभव येऊ द्या.'