पंजाबच्या मुख्यमंत्र्याच्या आव्हानाला विराट कोहलीचं काहीच तासांतच प्रत्युत्तर
Bhagwant Mann : विराट कोहलीसुद्धा दररोज शतक झळकावत नाही, आम्ही सतत मेहनत करतो, असे भगवंत मान यांनी म्हटले होते
Virat Kohli : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाबप्रमाणेच गुजरातमध्येही आम आदमी पक्ष (AAP) काही कमाल करेल अशी अपेक्षा काहींना होता. आपला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आली नाही. मात्र आपने या निकालासह राष्ट्रीय पातळीवरील पक्ष बनल्याचे घोषित केले आहे. निवडणुकीआधी प्रचारादरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला होता. पण आपला केवळ पाच जागांवर विजय मिळवता आला आहे.
काय म्हणाले भगवंत मान?
अशातच गुजरात निवडणुकीच्या निकालाबद्दल एका कार्यक्रमात बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (bhagwant Mann) यांनी एक दावा केला होता. मात्र काही वेळातच तो दावा फोल ठरला. भगवंत मान यांना गुजरात निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीबद्दल विचारले असता त्यांनी विराट कोहलीचे उदाहरण दिले. विराट कोहलीसुद्धा दररोज शतक झळकावत नाही, आम्ही सतत मेहनत करतो, असे भगवंत मान म्हणाले. आज तकच्या एका कार्यक्रमात बोलताना शनिवारी सकाळी भगवंत मान यांनी केलेले हे विधान सध्या चर्चेत आले आहे.
विराटने ठोकले शतक
भगवंत मान यांनी ज्यावेळी हे विधान केले तेव्हा भारतीय संघ हा बांगलादेशविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळत होता. यावेळी विराटने त्याच्या कारकिर्दीतील 44 वे शतक झळकावले. जवळपास तीन वर्षांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने शतक झळकावले आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नंतर विराटचा दुसऱ्या स्थानी आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने 113 धावांची तुफानी खेळी खेळली. यामध्ये विराटने 11 चौकारांसह 2 षटकार मारले. यासोबत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 44वे शतक ठोकले आहे.