`विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन तयार ठेवा,` BCCI ला सूचना, रोहित शर्माचं काय?
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाविरोधात अनुक्रमे 5, 100*, 7, 11, 3, 36 आणि 5 धावा केल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर (Border Gavaskar Trophy) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना दोघांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत असून, आता निवृत्ती पत्करावी अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे. रोहित शर्मा निवृत्ती घेणार हे आता जवळपास निश्चितच झाल्यासारखं दिसत आहे. पण विराट कोहलीच्या बाबतीत अद्याप स्पष्टता नाही आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अतुल वसन यांनी बीसीसीयआला दोन्ही फलंदाज संघर्ष करत असताना त्यांचा एक्झिट प्लॅन तयार ठेवावा असा सल्ला दिला आहे.
36 वर्षीय विराट कोहली मागील अनेक काळापासून मैदानावर संघर्ष करताना दिसत आहे. त्याने आधीच टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून, कसोटी करिअरही शेवटच्या टप्प्यावर दिसत आहे. दरम्यान अतुल वसन यांनी विराट कोहली सध्या संघाभोवती असणं गरजेचं आहे असं मत व्यक्त करताना विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन आणि वारसदार यांच्याबाबत प्लॅन तयार ठेवावा असा सल्ला दिला आहे.
"विराटने धावा केल्या आहेत. त्याला काय सुरु आहे याचीही कल्पना आहे. तो मानसिकदृष्ट्या स्पष्ट आहे. प्रत्येक खेळाडूला माझी सर्वोत्तम खेळी आता लवकरच होईल असं वाटत असतं. मी आता करेन असं वाटत असतं. हा फार मोठा काळ होता. संघाला यामुळे सहन करावं लागत आहे. त्यामुळेच प्रश्न विचारले जात असून आता संघातून वगळलं जावं असं म्हटलं आहे. एक मोठा जमाव तुमच्या दिशेने आहे," असं अतुल वसन यांनी एएनआयशी संवाद साधताना म्हटलं.
"त्यांना काय सुरु आहे याचीही कल्पना आहे. मला वाटतं एक्झिट प्लॅन म्हणजे त्यांच्यानंतर काय याबाबत स्पष्टता हवी. हे संघ व्यवस्थापन, संघ आणि क्रिकेटसाठी योग्य नाही. तुमच्या डोक्यात काय आहे याची आम्हाला कल्पना नाही," असंही अतुल वसन म्हणाले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीला पुन्हा एकदा आऊटसाई़ड ऑफ डिलिव्हरी खेळताना संघर्ष करावा लागला. एमसीजी कसोटीच्या पहिल्या डावात विराटने शिस्त दाखवली. त्याने 36 धावा केल्या. पण पुन्हा दोन्ही डावात 6व्या किंवा 7व्या स्टंप चेंडूला खेळण्याच्या नादात तो बाद झाला.
चौथी कसोटी सुरू होण्यापूर्वी, कोहलीने स्वतः कबूल केलं की ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचा अभाव आहे. आता फक्त सिडनी कसोटी बाकी असताना, जर तिथेही अपयश आलं तर विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधील त्याच्या भविष्याचा पुनर्विचार करावा लागू शकतो.