IPL 2024: तुम्ही आता 11 फलंदाज खेळवा; दिग्गज खेळाडू RCB संघावर संतापला, `तुमच्यापेक्षा तर...`
IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाने सनरायजर्स हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) केलेल्या वाईट गोलंदाजीमुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू के श्रीकांत फार दुखावले आहेत. त्यांनी थेट बंगळुरु संघाला 11 फलंदाजांना घेऊन मैदानात उतरा असा सल्ला दिला आहे.
IPL 2024: सनरायजर्स हैदराबादविरोधातील (Sunrisers Hyderabad) सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या गोलंदाजांनी केलेली वाईट कामगिरी पाहून भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू के श्रीकांत (Kris Srikkanth) फार दुखावले आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात फलंदाजांनी इतकी चांगली कामगिरी करुनही फक्त गोलंदाजांमुळे संघाला हा सामना गमवावा लागला. सोमवारी सनरायजर्स हैदराबादने 25 धावांनी पराभव केल्यानंतर बंगळुरु संघाच्या नावे सलग सहाव्या पराभवाची नोंद झाली. हैदराबादने या सामन्यात 287 धावांसह आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली. मुंबई इंडियन्सविरोधातील आपलाच 277 धावांचा रेकॉर्ड त्यांनी मोडला.
यानंतर के श्रीकांत यांनी बंगळुरु संघावर जोरदार टीका केली आहे. श्रीकांत यांनी बंगळुरु संघाला खासकरुन जेव्हा एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये सामना होईल तेव्हा 11 फलंदाजांसह खेळण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नाही तर विराट कोहलीने 287 धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या तुलनेत चांगली गोलंदाजी केली असती असं म्हटलं आहे.
"रिसची धुलाई होत आहे. लॉकी फर्ग्युसनलाही जोरदार फटके लगावले जात आहेत. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. त्याने कोलकाता ते बंगळुरू असा प्रवास केला आहे. विल जॅक्स हा त्यांचा सर्वोत्तम गोलंदाज होता," असं श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब शोवर सांगितलं.
"सर्वात उत्तम म्हणजे त्यांनी 11 फलंदाजांसह खेळावं. फाफ डू प्लेसिसला 2 ओव्हर्स टाकायला सांगा. कॅमरॉन ग्रीमला 4 ओव्हर्स द्या. मला तर वाटतं विराट कोहलीने 4 ओव्हर्स टाकल्या असत्या तरी कमी धावा दिल्या असत्या. विराट कोहली चांगला गोलंदाज आहे. एका क्षणी तर मला विराट कोहलीसाठी फार वाईट वाटत होतं. तो फक्त चेंडू मैदानाबाहेर जाताना पाहत होता. तो फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा फार चिडला होता. हेड त्यांची धुलाई करत होता. अब्दुल समादच्या फलंदाजीने तर कहर केला," असं श्रीकांत म्हणाले आहेत.
बंगळुरु संघाने एकाही स्पेशलिस्ट फिरकीपटूशिवाय सामना खेळला. मोहम्द सिराज सामन्यात खेळत नव्हता. बंगळुरुचे गोलंदाज फार अनुभवी दिसत नव्हते. त्यांनी विल जॅक्सला गोलंदाजी दिली ज्याने 3 षटकांत 32 धावा दिल्या. वेगवान गोलंदाज रीस टोपली, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि विजयकुमार विशक यांनी 10 षटकांत 137 धावा दिल्या.
हैदराबादच्या फलंदाजांनी या सामन्यात 22 षटकार ठोकत आणखी एक रेकॉर्ड केला. दुसरीकडे बंगळुरुने 16 षटकार ठोकले. पण हैदराबादने फलंदाजीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.