मुंबई : गौतम गंभीर हा सगळ्यात असुरक्षित आणि नकारात्मक होता, असा खुलासा टीम इंडियाचे माजी मानसिक अनुकूलन प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी केला आहे. गौतम गंभीर हा मानसिकदृष्ट्या असुरक्षित खेळाडू असल्याचं अप्टन यांनी त्यांचं पुस्तक 'द बेयरफूट कोच'मध्ये लिहिलं आहे. या पुस्तकात पॅडी अप्टन यांनी दिग्गज खेळाडूंच्या मानसिक मजबूतीवर भाष्य केलं आहे. तसंच परिस्थितीनुसार खेळाडूंनी कशा प्रतिक्रिया दिल्यायावरही त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अप्टन आपल्या पुस्तकात म्हणतात, 'मी गंभीरसोबत माझं सर्वश्रेष्ठ काम केलं, पण हे काम त्याच्यावर सगळ्यात कमी प्रभावी राहिलं. २००९ साली गंभीरला सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटर हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळीही मी गंभीरसोबत काम केलं होतं, पण या पुरस्काराचा आणि माझ्या कामाचा काहीही संबंध नव्हता.'


'गौतम गंभीर हा शतक केल्यानंतरही दु:खी असायचा. जेव्हा तो १५० रन करायचा, तेव्हा २०० रन का झाल्या नाहीत, याबद्दल त्याला वाईट वाटायचं. आपल्या काय चुका झाल्या, यावर त्याचा जोर असायचा', असं अप्टन यांनी या पुस्तकात सांगितलं आहे.


गंभीर नकारात्मक आणि निराशावादी


'मी आणि तेव्हाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी गौतम गंभीरबाबत सगळं काही केलं, तरी तो नकारात्मक आणि निराशावादी असायचा. मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्यापैकी गंभीर हा सगळ्यात कमजोर आणि मानसिकदृष्ट्या सगळ्यात असुरक्षित होता. असं असलं तरी तो जगातला सर्वश्रेष्ठ बॅट्समनपैकी एक होता. हेच त्याने २०११ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये सिद्ध केलं. भारताचा माजी कर्णधार धोनी हा भावनांवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवणारा होता, असं अप्टन म्हणाले.


गंभीरची प्रतिक्रिया


पॅडी अप्टन यांच्या या मताबद्दल आपण अजिबात नाराज नसल्याचं गंभीर म्हणाला. 'मला स्वत:ला आणि भारतीय टीमला सर्वश्रेष्ठ बनवायचं होतं. यासाठी १०० रन केल्यानंतरही मी संतुष्ट नसायचो. याबद्दलच पॅडी अप्टनने पुस्तकात लिहिलं आहे. मला यामध्ये काहीही चूक वाटत नाही,' असं स्पष्टीकरण गंभीरने पीटीआयशी बोलताना दिलं.


गौतम गंभीरची नवीन इनिंग


क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गौतम गंभीरने राजकारणाच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. भाजपच्या तिकिटावर गौतम गंभीर पूर्व दिल्लीमधून निवडणूक लढवत आहे.