`अर्शदीप सिंग बॉल टॅम्परिंग करतोय,` पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारतीय संघावर मोठा आरोप; `नवा चेंडू कधीच....`
टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshadeep Singh) जबरदस्त कामगिरी केली असून आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीप सिंगच्या नावे 15 विकेट्स जमा आहेत.
टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत असताना पाकिस्तानने मात्र पुन्हा एकदा कौतुक करण्याऐवजी या यशावर शंका उपस्थित घेण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इंझमाम उल-हक आणि सलीम मलिक यांनी भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि संघाने ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात बॉलशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात अर्शदीपला चेंडू स्विंग होण्यासाठी मदत मिळावी यासाठी भारताने चेंडूशी छेडछाड केली असावी असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मैदानातील अम्पायर्स अलर्ट नसल्याचा सांगत त्यांना खडेबोल सुनावले आहेत. आयसीसीचे कर्मचारी काही संघांना मदत करत असून भारतीय संघ त्यातील एक आहे असंही ते म्हणाले आहेत.
इंझमाम उल हकने नवीन चेंडू स्विंग होणं फार कठीण असतं, त्यासाठी तुम्हाला काहीतरी छेडछाड करावी लागते असंही इंझमामने म्हटलं आहे. "अर्शदीप सिंग जेव्हा 15 व्या ओव्हरला गोलंदाजी करत होता तेव्हा चेंडू स्विंग होत होता. नवा चेंडू कधीच इतक्या लवकर स्विंग होत नाही. याचा अर्थ स्विंग मिळावा यासाठी 12 व्या, 13 व्या ओव्हरला चेंडूसह छे़डछाड करण्यात आली होती. त्यामुळे अम्पायर्सनी आपले डोळे उघडे ठेवायला हवेत," असं इंझमामने 24 न्यूजशी बोलताना सांगितलं.
"असं म्हटलं जातं की, अम्पायर्स आपले डोळे काही संघांसाठी बंद ठेवतात आणि भारत त्यापैकी एक आहे. मला आठवतं की एकदा याबद्दल तक्रार केल्यानंतर यासाठी दंड ठोठावण्यात आला होता," असं सलीम मलिकने सांगितलं. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा खेळाडू असता तर पंचांनी टोकाची भूमिका घेतली असती, असंही इंझमाम म्हणाला.
"जर पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या बाबतीत असं झाले असते, तर त्यावर बरीच चर्चा झाली असती. जर अर्शदीपचा चेंडू 15 व्या षटकात स्विंग होत असेल, तर चेंडूशी काहीतरी छेडछाड करण्यात आली आहे," असं इंझमाम पुढे म्हणाला.
दरम्यान, अर्शदीप सध्या टी-20 स्पर्धेत भारतासाठी विकेट घेण्याच्या यादीत आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात 37 धावांत 3 गडी बाद करत अर्शदीपने सहा सामन्यांत 15 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यासह त्याने सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. अफगाणिस्तानचा फजलहक फारुकी सात सामन्यांत 16 बळी घेऊन अव्वल स्थानावर आहे.
अर्शदीपने आपल्या या यशासाठी जसप्रीत बुमराहला क्रेडिट दिलं आहे. "याचं बरंच श्रेय जस्सी भाईला (जसप्रीत बुमराह) जातं, कारण तो फलंदाजांवर खूप दबाव टाकतो. तो एका षटकात तीन किंवा चार धावा देतो. यामुळे फलंदाज माझ्याविरुद्ध आक्रमक खेळतात आणि मी फक्त माझा सर्वोत्तम चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे विकेट्स मिळण्याची खूप शक्यता असते,” असं तो म्हणाला.