...तर, तलवारींनी माणसंही मारेन- जावेद मियाँदाद
काश्मीर मुद्दयावर पाकिस्तानी खेळाडू बरळला
मुंबई : काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द झाल्यनंतर काही स्तरांतून भारत सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. तर, काही स्तरांतून मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. पाकिस्तानकडून हा निर्णय जाहीर झाल्या दिवसापासूनच खुरापतींचं प्रमाणे वाढल्याचंही पाहायला मिळालं. याच सर्व तणावाच्या वातावरणात आता नव्याने भर पडली आहे, ती म्हणजे एका पाकिस्तानी खेळाडूच्या वक्तव्याची.
पाकिस्तानी क्रिकेट संघातील माजी खेळाडू, फलंदाज जावेद मियाँदाद यांनी एक धक्कादायक वक्तव्य करत काश्मीर मुद्यावर आपले हिंसक विचार सर्वांसमोर ठेवले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'काश्मीरी बांधवांनो तुम्ही चिंता करण्याचं काहीच कारण नाही..... आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत', असं मोठ्या आवोगात म्हणत मियाँदाद यांनी म्यानातून तलवार काढली. 'मी फलंदाजी करताना षटकार मारू शकतो, तर या तलवारीने माणसं मारु शकत नाही का.....', असं वक्तव्य त्यांनी केलं.
मियाँदाद यांचं हे वक्तव्य पाहता, भारत- पाकिस्तान मुद्द्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या तणावग्रस्त परिस्थितीवर भाष्य करणारे मियाँदाद हे काही पहिलेच क्रिकेटपटू नाहीत. यापूर्वी शाहीद आफ्रिदी यानेही ट्विट करत या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली होती. तर, मियाँदाद यांनी भारताला अण्वस्त्र वापरुन बेचिराख करु असं बेताल वक्तव्य केलं होतं. त्यातच आता त्यांची ही शाब्दिक तलवारबाजीची भाषा पाहता सोशल मीडियावरही क्रिकेट रसिकांनी त्यांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.