भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma)  गेले काही महिने फार खडतर प्रवासाचे राहिले आहेत. बांगलादेशविरोधातील सामन्यातून भारताने आपल्या कसोटी हंगामाला सुरुवात केली, दरम्यान मागील सात सामन्यांमधील फक्त चार सामन्यात भारतीय संघ 250 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली धावा करण्यात अपयशी ठरले आहे. रोहितने मागील सहा कसोटी सामन्यांमध्ये फक्त 142 धावा केल्या आहेत. कसोटीत रोहित शर्मा धडपडताना दिसत असून, ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांची निराशा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Insidesport ला दिलेल्या मुलाखतीत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डॅरिल कलिननने (Daryll Cullinan) रोहितवर परखड शब्दांत टीका केली आहे. त्याने भारताच्या कर्णधाराला ओव्हरवेट म्हणजेच जास्त वजन असल्याचं म्हटलं आहे. तसंच 'फ्लॅट-ट्रॅक बुली' असा उल्लेख केला आहे. एक खेळाडू जो निकृष्ट विरोधकांवर वर्चस्व गाजवतो, परंतु जो टॉपच्या विरोधकांना पराभूत करू शकत नाही. तसंच रोहित शर्मा दीर्घकालीन पर्याय नाही अशी टीकाही केली आहे. 


“रोहितचे वजन जास्त आहे आणि दीर्घ कसोटी मालिकेत टिकण्यासाठी शारीरिक स्थिती चांगली नाही. त्याची तुलना विराटशी केल्यानंतर फिटनेस पातळीतील फरक धक्कादायक आहे. रोहित आता भारतासाठी दीर्घकालीन पर्याय नाही," असं त्याने म्हटलं आहे. मुलाखतीत त्याने पुढे म्हटलं आहे की, "रोहित हा फ्लॅट-ट्रॅक बुली आहे, ज्याचा घऱच्या मैदानावर जबरदस्त रेकॉर्ड आहे". रोहित शर्मासमोर बाऊन्सर खेळण्याची मोठी समस्या असून, यामुळेच तो अनेकदा बाद होतो याकडेही त्याने लक्ष वेधलं.  


दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनने भारतीय फलंदाजांना 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ब्रिस्बेन कसोटीत चांगली आणि वेळेवर फलंदाजी करण्याचं आवाहन केलं आहे. ॲडलेड येथे गुलाबी चेंडूवर निराशाजनक फलंदाजी केल्यानंतर, टीम इंडिया मोठ्या धावा आणि ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय मिळवण्यासाठी आतुर असेल.


जसप्रीत बुमराह, केएल राहुल, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी उत्कृष्ट योगदान दिल्याने भारताने पर्थमधील कसोटी दिमाखात जिंकली होती. पण यजमान ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केलं. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला चांगलं पुनरागमन करता आलं. ट्रॅव्हिस हेडच्या प्रतिआक्रमणाने त्यांना मदत केली. 19 धावांच्या अत्यंत सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा 10 गडी राखून पराभव केला.


केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने पर्थ येथे 487/6 घोषित करून चांगली कामगिरी केली असली तरी, बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी हंगामाच्या सुरुवातीपासून टीम इंडियाची फलंदाजी मोठ्या प्रमाणात टीकेचं लक्ष्य आहे.