`आमच्यातील मतभेदांसंदर्भात...`; जय शाहांबरोबरच्या वादावर गंभीर थेट बोलला; म्हणतो, `माझं..`
Gautam Gambhir On Jay Shah: गौतम गंभीर आणि जय शाह या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चा असतानाच यावर गंभीरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Gautam Gambhir On Jay Shah: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी विराजमान झालेला माजी सलामीवीर गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांच्याबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गंभीरने जय शाहांबद्दल मनमोकळेपणे भाष्य केलं. मागील काही दिवसांपासून सहाय्यक प्रशिक्षकपदापासून ते इतरही अनेक मुद्द्यावरुन जय शाह आणि गंभीरमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत असतानाच आता यावर गंभीरनेच थेट भाष्य केलं आहे.
जय शाहांबद्दल काय म्हणाला गंभीर?
"माझं आणि त्यांचं नातं फार छान आहे. जय शाह आणि मी एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो. आमच्यातील मतभेदांसंदर्भात चर्चा आणि शक्यता या वेगवेगळ्या तर्कांच्या आधारे मांडल्या जातात," असं म्हणत गंभीरने जय शाहांबरोबर वाद असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. विशेष म्हणजे पुढे बोलताना गंभीरने, "आम्ही प्रसारमाध्यमांमध्ये येऊन बोलण्यापेक्षा एकमेकांशी जे काही आहे ते बोलून स्पष्ट करु. आम्ही फार वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आतापर्यंत आमचं नातं फार छान राहिलं आहे. हे नातं असच राहील अशी अपेक्षा आहे," असंही म्हटलं.
विराटबरोबरच्या नात्यावरही बोलला
गौतम गंभीरने यावेळेस बोलताना केवळ जय शाहाचं नाही तर विराट कोहलीबरोबरच्या कथित वादाबद्दलही भाष्य केलं विराटबरोबरचं नात फारच छान असून ते सार्वजनिक चर्चेसाठी असा टोला गंभीरने लगावला आहे. "विराटबरोबर माझं नातं काय आहे हा टीआरपीचा विषय नाही," असं गंभीरने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना म्हटलं. "सध्याच्या क्षणाला आम्ही भारताचं प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही 140 कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करतोय. आमचं मैदानाबाहेरचं नातं उत्तम आहे. मात्र हे नातं सार्वजनिक नाही. मी त्याच्याबरोबर सामन्यादरम्यान किंवा सामन्यानंतर किती बोलतो हे महत्त्वाचं नाही. तो फार प्रोफेश्नल आहे. तो जागतिक दर्जाचा खेळाडू असून तो त्याच पद्धतीने खेळत राहील अशी अपेक्षा आहे," असं गंभीर विराटबद्दलच्या प्रश्नावर म्हणाला.
नक्की वाचा >> रविंद्र जडेजासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद? आगरकर स्पष्टपणे म्हणाला, 'त्याला वगळण्यात..'
विराटबरोबर चर्चा झाली
"विराट कोहलीबरोबर मैदानाबाहेरही माझं नातं फार छान आहे. ते मी आहे तसेच ठेवणार आहे. मात्र आमचं नातं कसं आहे हे सार्वजनिक करणं मला पटत नाही. मला वाटतं की दोन व्यक्तींमधील नातं ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. माझी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर मी विराटबरोबर मेसेजवरुन बरीच चर्चा केली. माझे त्याच्याबरोबर फार छान संबंध असून ते कायम राहतील," असंही गंभीर म्हणाला.