नवी दिल्ली: गौतम गंभीर हा भारतीय क्रिकेट संघातील एक गुणी खेळाडू. पण, त्याच बरोबर तो एक अत्यंत संवेदनशील व्यक्तीही आहे. समाजातील अनेक विषयांवर त्याने या आधीही आपली मते व्यक्त केली आहेत. आताही त्याने महिलांवरील अत्याचार आणि समाजात वाढणारी गुन्हेगारी याबाबत मत व्यक्त केले आहे. हे मत व्यक्त करताना गंभीरला एक भीतीही सतावते आहे. समाजातील घटना पाहून आपल्या मुलीने जर, बलात्कार या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारला तर, उत्तर काय द्यायचे? असा 'गंभीर' प्रश्न गौतमच्या मनात निर्माण झाला आहे. याच प्रश्नाने त्याचे मन भीतीने कातर झाले आहे.


१४व्या वर्षी बलात्कार हा शब्द कळला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीर म्हणतो की, मी १४ वर्षे वयाचा असताना बलात्कार हा शब्द मला पहिल्यांदा कळला. या शब्द कळण्यामागची एक त्याची व्यक्तिगत कहाणीही त्याने सांगितली आहे. तो म्हणतो, साधारण १९८० चे ते वर्ष असावे. आता मला नक्की आठवत नाही पण, दूरदर्शन किंवा असाच कुठेतरी मी ‘इन्साफ के तराजू’ हा चित्रपट पाहिला. बलात्कार पीडित दोन व्यक्तिंच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. राज बब्बर यांनी बलात्कारी व्यक्तिची भूमिका केली आहे. तर, बलात्कार पीडित व्यक्ती जेव्हा आरोपीची हत्या करतात तेव्हाच त्यांना न्याय मिळाला असे वाटते. आज समाजात पाहिले तर, लहान बालके ते तरूण आणि वृद्ध व्यक्तींवरही बलात्कार झाल्याच्या घटना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत माझ्या मुलीने मला बलात्काराचा अर्थ विचारला तर? अशी भीती मला वाटत असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे.


कठुआ, उन्नाव बलात्कार घटना लाजिरवाण्या


दरम्यान, आपल्याला दोन मुली असून, दोन मुलींचा पीता असल्याचा मला प्रचंड आनंद आहे. पण, मनात थोडी भीतीही आहे. आनंददायी गोष्ट अशी की शाळेत त्यांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल सांगितलं जातं. पण, भीतीदायक हे की, समाजात बलात्कारासारख्या घटना रोज घडत आहेत. गंभीरने कठुआ, उन्नाव बलात्कार आणि इतर घटनांचा उल्लेख करताना हे अत्यंत लाजिरवाणं असल्याची भावनाही व्यक्त केली आहे.