Gautam Gambhir Slams Rahul Gandhi: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर मोदींनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना आधार देताना निराश न होता तुमच्या खेळामुळे तुम्ही सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करुन दाखवली असं सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हात हातात धरुन त्यांना खचून न जाता नव्या जोमाने खेळा असंही सांगितलं. पंतप्रधान मोदींनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन घेतलेल्या या भेटीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा दिसून आली. अनेकांनी मोदींच्या या भूमिकेचं कौतुक केलं. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे नेत राहुल गांधींनी यावरुन टीका करताना मोदींचा उल्लेख पनौती असा केला. 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वर्ल्ड कप फायलनचा संदर्भ देत राहुल गांधींनी केलेल्या या विधानावरुन वाद निर्मा झाला.


गंभीरने केली टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरही राहुला गांधींनी केलेली टीका आणि या सामन्यासंदर्भात बरीच चर्चा झाली. मात्र माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा विद्यमान खासदार गौतम गंभीरनेही यावर प्रतिक्रिया नोंदवताना राहुल गांधींनी अशी प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती असं म्हटलं आहे. गौतम गंभीरने 2011 साली झालेल्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला मोहालीमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आले होते त्यावेळेचा संदर्भाही दिला.


आम्ही तो सामना हारलो असतो आणि...


"कोणत्याही व्यक्तीविरोधात वापरण्यात आलेला सर्वात वाईट शब्द म्हणजे त्यांनी (राहुल गांधींनी) वापरलेला पनौती हा शब्द. खास करुन तो पंतप्रधानांबद्दल वापरण्यात आला हे फार वाईट आहे. 2011 च्या वर्ल्ड कप सेमी फायनल पाहण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. आम्ही तो सामना हारलो असतो आणि ते आम्हाला भेटायला आले असते तर त्यात चुकीचं असं काय म्हणता आलं असतं?" असा प्रश्न गौतम गंभीरने उपस्थित केला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विधान केलं आहे. 



राहुल गांधींविरोधात टीकेची झोड


राहुल गांधींनी राजस्थानमधील निवडणूक प्रचाराच्या सभेमध्ये पंतप्रधानांविरोधात हा शब्द वापरला होता. राहुल गांधीच्या या विधानावरुन भाजपाने आक्षेप घेतला होता. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींनी काढलेले उद्गार हे लज्जास्पद आणि अपमानकारक असल्याचं म्हटलं होतं. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी राहुल गांधींवर टीका करताना हे विधान म्हणजे राहुल गांधींची मानसिक स्थिती बिघडल्याचं लक्षण असल्याचं म्हटलं.