नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघानं (डीडीसीए) अंडर-२३ क्रिकेटपटू अनुज डेढावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या अंडर-२३ टीममध्ये निवड न झाल्यामुळे अनुजनं भारताचे माजी फास्ट बॉलर आणि निवड समितीचे अध्यक्ष अमित भंडारी यांच्यावर हल्ला केला होता. सोमवारी सेंट स्टीफन्स मैदानामध्ये डेढा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी भंडारींना हॉकी स्टीक आणि लोखंडाच्या रॉडनं मारहाण केली. अमित भंडारी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी दिल्लीच्या टीमचा सराव सामना पाहण्यासाठी आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुज डेढा आणि त्याच्या १५ साथिदारांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अमित भंडारी जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अमित भंडारींना सोडून देण्यात आलं. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अनुज डेढाला अटक केली आहे.


या सगळ्या प्रकारानंतर डीडीसीए अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले, 'डेढावरच्या शिक्षेसाठी बुधवारी बैठक होईल. पण त्याच्यावर आजीवन बंदी घालणं ही फक्त औपचारिकता बाकी आहे. अनुज डेढावर कायमची बंदी घालण्याचा सल्ला आमचा माजी कर्णधार गौतम गंभीरनं दिला आहे. आमच्याकडे त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही'.


'दिल्लीच्या सगळ्या निवड समित्यांनी भयमुक्त राहून टीमची निवड करावी. याप्रकरणी मी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली आहे, आणि पोलिसांनी याप्रकरणाचा सगळ्या बाजूंनी तपास करण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यामागे काही षडयंत्र तर नाही ना? याचा तपास करण्यात यावा', असं वक्तव्य रजत शर्मा यांनी केलं.