मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडियाच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. कर्णधार सौरव गांगुलीने खेळाडूंना जास्त संधी द्यावी, असा सल्ला गांगुलीने दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कुलदीप यादवला बाहेर बसवल्यामुळे मला आश्चर्य वाटलं. याआधी भारताने खेळलेल्या शेवटच्या टेस्टमध्ये कुलदीपने ५ विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये झालेल्या या टेस्ट मॅचसाठीची खेळपट्टी ही बॅट्समनना अनुकूल होती,' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.


अश्विनला टीमबाहेर बसवण्यावरही गांगुलीने भाष्य केलं. 'अश्विनचं रेकॉर्ड हे उत्तम आहे. पण त्याची निवड न करण्याचा निर्णय विराटने घेतला. पुढच्या दोन दिवसांमध्ये जडेजा किती विकेट घेतो, त्यावर सगळं कळेल. कारण आता खेळपट्टीवर बॉल अचानक खाली राहतिल किंवा वरती उसळतील,' असं गांगुली म्हणाला. अश्विनला डावलण्यात आलं असलं तरी टीममध्ये स्पर्धाही तशीच असल्याचंही गांगुलीने सांगितलं.


याआधीही भारतीय टीमच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आक्रमक बॅट्समन हवेत म्हणून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला टीममधून वगळण्यात आलं होते, तेव्हा विराटवर टीका झाली होती.


'खेळाडूंची निवड करा आणि त्यांना जास्त आणि सातत्यपूर्ण संधी द्या. यामुळे खेळाडूंना विश्वास मिळतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये श्रेयस अय्यर कसा खेळला, हे सगळ्यांनी बघितलं. तुम्ही त्याची निवड केलीत आणि त्याला खेळण्याचं स्वातंत्र्य दिलंत. तसंच स्वातंत्र्य आणि संधी बऱ्याच खेळाडूंना मिळाली पाहिजे. विराट ही संधी देईल, असा मला विश्वास आहे,' असं वक्तव्य गांगुलीने केलं.


पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान अश्विनला डावलण्यात आल्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकरही चांगलेच भडकले. अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ११ टेस्ट मॅचमध्ये ६० विकेट घेतल्या. यात ४ वेळा एका इनिंगमध्ये ५ विकेटचा समावेश आहे. याचबरोबर अश्विनने या ११ टेस्टमध्ये ५५२ रन केल्या, ज्यात ४ शतकं देखील आहेत. एवढं चांगलं रेकॉर्ड असताना अश्विन टीममध्ये नाही, हे आश्चर्यकारक आहे, असं गावसकर लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले.