विराट कोहलीने मला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं; ग्लेन मॅक्सवेलचा खुलासा, म्हणाला `तू मला डिवचल्याने...`
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) खुलासा केला आहे की, भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला इंस्टाग्रामवर (Instagram) ब्लॉक केलं होतं.
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आज एकमेकांचे चांगले मित्र असले तरी एक वेळ अशी होती जेव्हा दोघांच एकमेकांशी फार जमत नव्हतं. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेलचं 'The Showman' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्याने कशाप्रकारे विराट कोहलीने त्याला संघात स्थान मिळावं यासाठी पाठिंबा देत मदत केली याबद्दल सांगितलं आहे. त्याने विराट कोहलीचे याबद्दल आभारही मानले आहेत. पण आयपीएलमध्ये एकाच संघातून खेळण्याच्या चार वर्षं आधी विराट कोहलीने मॅक्सवेलला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं होतं.
"जेव्हा मी बंगळुरु संघाकडून खेळणार असल्याचं नक्की झालं तेव्हा विराट कोहली पहिला खेळाडू होता ज्याने मला मेसेज केला आणि संघात स्वागत केलं. मी आयपीएलच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये गेल्यानंतर आमच्यात फार बोलणं होऊ लागलं, एकत्र वेळ घालवू लागलो. यानंतर मी सोशल मीडियावर त्याला फॉलो करण्यासाठी गेलो होते. पण त्याआधी मी असा विचारही केला नव्हता. ही गोष्ट माझ्या डोक्यातही आली नव्हती. मला तो सापडतच नव्हता," असं मॅक्सवेलने LiSTNR Sport च्या पॉडकास्टमध्ये सांगितलं.
"मला खात्री होती की तो सोशल मीडियावर आहे, त्यामुळे मी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. त्य़ाला इंस्टाग्राम माहिती नाही, असं तर काहीच नव्हतं. यानंतर कोणीतरी म्हणालं कदाचित त्याने तुला ब्लॉक केलं असावं यामुळेच तो सापडत नसावा. त्याला शोधू शकत नसशील तर हेच एक कारण असू शकतं. पण मी असं अजिबात नसेल असं म्हटलं," अशी माहिती ग्लेन मॅक्सवेलने दिली.
"मी त्याच्याकडे जाऊन तू मला इंस्टाग्रामला ब्लॉक केलं आहेस का? असं विचारलं. त्यावर त्याने कदाचित हो असं उत्तर दिलं. तू मला कसोटी सामन्यादरम्यान जेव्हा डिवचलं बहुतेक तेव्हा केलं असावं. मला ते आवडलं नसल्याने मी ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. मला ते योग्य वाटलं. पण नंतर त्याने मला अनब्लॉक केलं आणि आम्ही चांगले मित्र झालो," असं ग्लेन मॅक्सवेलने सांगितलं. पण आमच्यात चांगली मैत्री असून, आयपीएल एकत्र खेळण्यापर्यंत आमचे एक मजेदार नाते आहे. ती ड्रेसिंग रूम आणि अनुभव शेअर करणे, पालक होणं असंही मॅक्सवेलने सांगितलं.