अमर काणे, झी मीडिया, नागपूर : घरात अठरा विश्वं दारिद्र्य असलेली नागपूरची प्राजक्ता गोडबोले अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत तिनं सुवर्णपदक पटकावलं. तिच्या जिद्दीची कहाणी सांगणारा हा खास रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीवर सहज मात करता येते. घवघवीत यशही मिळवता येतं. नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेनं हेच पुन्हा एकदा सिद्ध केलंय.


गुलबर्गा इथं झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या १० किलोमीटर शर्यतीन प्राजक्तानं सुवर्ण पदक जिंकलं... नागपूर विद्यापीठाचं नाव उंचावलं. पण तिच्या या यशामागं आहे तो मोठा संघर्ष. आणि तिनं घेतलेले अपार कष्ट.


नागपूरच्या सिरसपेठमधलं हे प्राजक्ताचं घर खाली व्हि़डीओत पाहा. घर कसलं, ही तर एक पत्र्याची झोपडी. या झोडपडीत प्राजक्ताचे आई वडिल आणि बहिणी राहतात. झोपडीची अवस्था पाहिली की तिच्या घरची परिस्थिती किती बेताची आहे, याची कल्पना येते. 


सततच्या आजारपणामुळं वडील घरीच असतात. आई कॅटरर्सकडे स्वयंपाक करून घरचा गाडा कसाबसा चालवते. त्यात तिघा बहिणींची जबाबदारी या एकट्या माऊलीवर पडलीय. त्यामुळं प्राजक्ताच्या कामगिरीची दखल घेत, सरकारनं तिला नोकरी द्यावी तसंच आर्थिक मदत करावी, एवढीच या माऊलीची अपेक्षा आहे...


झोपडीवजा घरात जागोजागी लटकणारी प्राजक्ताची ही मेडल्स आणि बक्षीसं. तिच्या संघर्षाची कहाणी सांगणारी... प्राजक्ताच्या सुवर्ण पदकामुळं या झोपडीत आनंदाचे सुवर्णक्षण परतलेत.