मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज भारतानं गमावली आहे. तीन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर पडला आहे. सीरिजची तिसरी टेस्ट बुधवारपासून जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात येईल. केपटाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये ७२ रन्सनी आणि सेंच्युरिअनमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये १३५ रन्सनी भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या संघ निवडीवर टीका होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लागोपाठ ९ सीरिज जिंकल्यानंतर पहिली टेस्ट सीरिज हरल्यावर विराट कोहलीला पत्रकार परिषदेमध्ये कठोर प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर विराट कोहलीचा पारा चढला होता. या सगळ्या प्रकरणानंतर आता दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथनं विराटच्या कर्णधारपदावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.


विराट कोहली जास्त काळ भारताचा कर्णधार राहील असं मला वाटत नाही, असं वक्तव्य ग्रॅम स्मिथनं केलं आहे. भारताबाहेर खेळताना तुम्हाला दबावाचा सामना करावा लागेल हे विराटनं लक्षात घ्यावं. परदेशात खेळताना भारतासारखी परिस्थिती नक्कीच नसेल, असा सल्ला स्मिथनं विराटला दिलाय.


प्रशिक्षकांनी विराट कोहलीला आव्हान देण्याची गरज आहे. यामुळे विराट कर्णधार म्हणून अधिक परिपक्व होईल, असं स्मिथला वाटतंय. विराट कोहली एक आक्रमक खेळाडू आहे. या आक्रमकतेचा त्याच्या खेळाला फायदा होतोय पण टीमला याचं नुकसान होतंय. विराट कोहलीशी स्पर्धा करायला अन्य खेळाडूंना कठीण जात असल्याचं मत स्मिथनं मांडलंय.


विराट कोहली खेळाडू म्हणून मोठा होत आहे पण कर्णधार म्हणून त्याला वागण्यामध्ये नम्रता आणावी लागेल तरच तो टीमला घेऊन पुढे जाऊ शकेल, असं वक्तव्य स्मिथनं केलंय.