GT vs RCB: गुजरात विरुद्ध बंगळुरु कोण जिंकणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
GT vs RCB playing 11 Prediction: आज आयपीएलमध्ये `सुपर संडे` पाहायला मिळेल. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी? पाहा हेड टू हेड आकडेवारी आणि खेळपट्टी कशी असेल....
GT vs RCB head to head record in Marathi: आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 45 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना आज (28 एप्रिल) दुपारी 3.30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे. आजच्या सामन्यात या दोन्ही संघांसाठी 'आर या पार' असणार आहे. कारण गुणतालिकेत दोन्ही संघांची स्थिती अगदी सारखीच आहे. आरसीबीने मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. त्याचवेळी, गुजरातला शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून एका रोमांचक सामन्यात 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आरसीबीला गुजरातविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.
अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यजमान संघ गुजरात टायटन्स यांच्यात एकही सामना खेळला गेला नाही. आज पहिल्यांदाच हे दोन्ही संघ या भव्य स्टेडियममध्ये आमनेसामने येणार आहेत. या दोन संघांमधला शेवटचा सामना आठवत असेल तर तो सामना गेल्या मोसमात बंगळुरूमध्ये खेळला गेला होता. त्या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने 19.1 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. या दोन्ही संघाला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.
हेड टू हेड आकडेवारी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात या दोन संघांचे हेड-टू-हेड रेकॉर्ड काय होते ते जाणून घेऊया. आतापर्यंत हे दोन्ही संघ आयपीएलमध्ये केवळ 3 वेळा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने दोनदा विजय मिळवला आहे. तर आरसीबीला केवळ एकच सामना जिंकण्यात यश आले आहे. आता जेव्हा दोन्ही संघ चौथ्यांदा आयपीएलमध्ये भिडतील तेव्हा अनेक दिग्गज खेळाडूंचे लक्ष असेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सर्वात प्रमुख नाव विराट कोहलीचे आहे. जो सध्या या हंगामात सार्वधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार आणि लॉकी फर्ग्युसन सारख्या खेळाडूंवर नजर असणार आहे. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सबद्दल बोललो तर चाहत्यांची नजर त्यांचा कर्णधार शुभमन गिल यांच्यासह साई सुदर्शन, राशिद खान आणि डेव्हिड मिलरवर असणार आहे.
अशी असेल अहमदाबादची खेळपट्टी?
गुजरात आणि आरसीबी यांच्यातील रोमांचक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. अहमदाबादच्या या मैदानावर फलंदाजांचे वर्चस्व असेल. कारण या मैदानात चेंडू बॅटवर खूप चांगला येतो आणि शॉट्स मारणे खूप सोपे आहे. मात्र, मोठ्या चौकारामुळे या मैदानावर फिरकीपटू विकेट घेण्यात यशस्वी ठरतात. यासोबतच फिरकीपटूंनाही खेळपट्टीची थोडीफार मदत मिळते. तसेच नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचे आतापर्यंत एकूण 31 सामने खेळण्यात आले. यापैकी 14 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 17 सामने या मैदानात जिंकले आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 होती. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या गुजरात टायटन्सच्या नावावर आहे, ज्याने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 233 धावा केल्या होत्या.
दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा
आयपीएल 2024 च्या प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आरसीबीला गुजरातविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवावा लागेल. या संघाने आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी आरसीबीने केवळ 2 सामने जिंकले आहेत. तर 7 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आता प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे.
गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग 11
ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वारियर, साई सुदर्शन.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य प्लेइंग 11
फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल, स्वप्नील सिंग.