भारतीय संघातून बराच काळ बाहेर बसल्यानंतर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल अखेर पुनरागन करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील दौऱ्यात युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये युजवेंद्र चहलने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली. दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. युजवेंद्र चहलसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असल्याचं बोललं जात आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने निवडकर्त्यांना त्याला फक्त लॉलीपॉप दिल्याचा टोला लगावला आहे. तसंच टी-20 संघातून त्याला वगळलं असल्याकडे लक्ष वेधलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"टी-20 संघात युजवेंद्र चहलला संधी दिली नाही. तुम्ही त्याला एकदिवसीय संघात ठेवलं आहे, पण टी-20 त नाही. त्याला लॉलीपॉप दिला आहे. तुम्ही ज्या फॉरमॅटमध्ये चांगले खेळलात, त्यात घेणार नाही पण इतर फॉरमॅटमध्ये घेणार. हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे," असं हरभजन सिंगने युट्यूब चॅनेलवर म्हटलं.


हरभजन सिंगने चहलव्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि उमेश यादव यांनाही वगळण्यावर भाष्य केलं. त्यांच्यासाठी संघात पुनरागमन करण्याचा मार्ग फारच खडतर आहे हे स्पष्ट करताना हरभजन सिंगने आता व्यवस्थापनाने तिघांनाही त्यांची निवड का केली जात नाही याबद्दल स्पष्ट सांगावं असं म्हटलं आहे.  


"दक्षिण आफ्रिकेचा दौरा सोपा नाही. फलंदाजांसाठी फार आव्हान असणार आहे. तिथे तुमच्याकडे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे नसणार आहेत. तरुणांना संधी मिळाली पाहिजे, ही चांगली बाब आहे. पण मला वाटत नाही की निवडकर्त्यांची रहाणे, पुजारा किंवा उमेश यादवशी चर्चा झाली आहे. कारण उमेश यादवला जेव्हा कधी संधी देण्यात आली तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे," असं हरभजन सिंग म्हणाला. 


पुढे त्याने सांगितलं की, "मला वाटतं पुनरागमन करण्याचा मार्ग फार खडतर आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी समर्पण दिलं असून मोठे खेळाडू आहेत. बोर्डाने त्यांच्याशी चर्चा करायला हवी. त्यांची निवड का करण्यात आलेली नाही आणि करिअरसाठी पुढील मार्ग काय असेल याबद्दल कळवायला हवं," असं हरभजन म्हणाला.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुजारा, रहाणे आणि उमेश यादव भारतीय संघाचा भाग होते. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. 


कसोटीसाठी भारतीय संघ: 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी, जसप्रीत बुमराह (व्हीसी), प्रसिद्ध कृष्णा