`हरभजन इस्लाम स्विकारणार होता`, इंजमाम उल-हकचा धक्कादायक दावा; क्रिकेटर म्हणाला `कोणता नशा...`
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमाम उल-हकने भारतीय गोलंदाज हरभजन सिंगचा उल्लेख करत एक धक्कादायक दावा केला आहे. यानंतर हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमाम उल-हकने माजी भारतीय गोलंदाज हरभजन सिंगसंबंधी एक धक्कादायक दावा केला आहे. इंजमाम उल-हकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने हरभजन सिंग इस्लाम स्विकारणार होता असं म्हटलं आहे. एका मुलाखतीत इंजमाम उल-हकने हे विधान केलं आहे. इंजमाम उल-हक मौलाना तारीक जमील यांच्यामुळे इतका प्रभावित झाला होता की, तो जवळजवळ इस्लाम स्विकारणार होता असं त्याने सांगितलं. यानंतर हरभजन सिंग यावर व्यक्त झाला असून संताप व्यक्त केला आहे.
इंजमाम उल-हकचा दावा काय?
"आमची एक खोली होती जिथे प्रार्थना होत असे. मौलाना तारीक जमील तिथे संध्याकाळी यायचे आणि आमच्यासह नमाज पठण करत असत. आम्ही इरफान पठाण, मोहम्मद कैफ आणि झहीर खान यांनाही आमच्यासह नमाज पठण करण्यासाठी बोलवायचो आणि तेदेखील यायचे. काही दिवसांनी अजून काही भारतीय क्रिकेटर्स आले. ते तिथे बसून आम्हाला नमाज करताना पाहत असत. मौलाना नमाज संपल्यानंतर आमच्याशी गप्पाही मारत असत. एके दिवशी हरभजन सिंगने मला सांगितलं की, मी या व्यक्तीचं (मौलाना) बोलणं ऐकून फार प्रभावित झालो आहे. याचं म्हणणं ऐकावं असं माझं मन मला सांगत आहे," असा दावा इंजमाम उल-हकने केला आहे.
इंजमाम उल-हकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हरभजन सिंग त्यावर व्यक्त केला आहे. त्याने म्हटलं आहे की, "हा कोणता नशा करुन बोलत आहे? मला भारतीय आणि शीख असल्याचा अभिमान आहे. हे बकवास लोक काहीही बोलतात".
तत्पूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि मुख्य निवडकर्ता इंजमाम-उल-हक यांच्यातील मतभेद समोर आले होते. क्रीडा प्रशासकीय मंडळाने माजी कर्णधाराचा राजीनामा स्वीकारल्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला होता. पीसीबीने इंजमाम उल-हकचा राजीनामा स्विकारल्याचं निवेदनाद्वारे जाहीर केलं होतं.
"पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंजमाम उल-हकचा राष्ट्रीय पुरुष निवड समिती आणि कनिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला आहे आणि योग्य वेळी त्याच्या बदलीची घोषणा करेल," असं बोर्डाने सांगितलं आहे.
इंजमाम उल-हकने 30 ऑक्टोबरला स्वेच्छेने हितसंबंधांच्या विरोधातील आरोपांबद्दल पारदर्शक चौकशी करण्याची संधी पीसीबीलाला देण्यासाठी आपल्या पदावरून पायउतार आले असंही निवेदनात सांगण्यात आलं.