आता तरी जरा मोठा हो, हरभजनचं सायमंड्सला प्रत्युत्तर
२००८ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या वादाचं भूत पुन्हा एकदा समोर आलंय.
मुंबई : २००८ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या वादाचं भूत पुन्हा एकदा समोर आलंय. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एन्ड्रयू सायमंड्सनं आता हरभजनबद्दल नवा खुलासा केला आहे. २००८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या सिडनी टेस्टनंतर हरभजन सिंग भावूक झाला होता. यानंतर हरभजननं वैयक्तिकरित्या माझी माफीही मागितली होती. पण एन्ड्रयू सायमंड्सच्या या दाव्याची हवा हरभजननं काढून घेतली आहे.
सायमंड्सच्या या दाव्यानंतर हरभजन सिंगनं एक ट्विट केलं आहे. माझ्या मते सायमंड्स हा एक चांगला क्रिकेटपटू होता. पण तो आता एक चांगला काल्पनिक लेखक बनला आहे. त्यानं २००८ सालीही गोष्ट विकली होती आणि आता २०१८ सालीही तो गोष्टच विकत आहे. मित्रा मागच्या १० वर्षांमध्ये जग पुढे गेलं आहे. आता तरी जरा मोठा हो, असं ट्विट हरभजननं केलं आहे.
हरभजन सिंग आणि एन्ड्रयू सायमंड्स आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळले आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार २०११ साली हरभजननं माफी मागितल्याचं सायमंड्स म्हणाला. त्यावेळी आम्ही दोघं एकाच टीमकडून खेळत होतो.
एक दिवस पार्टी सुरु असताना पूर्ण टीम आणि पाहुणे तिकडे होते. त्यावेळी हरभजन माझ्याजवळ आला आणि मी तुझ्याशी एक मिनिट दुसरीकडे जाऊन बोलू शकतो का? असं विचारू लागला. मी सिडनीमध्ये जे केलं त्याबद्दल तुझी माफी मागू इच्छितो. तुला किंवा तुझ्या कुटुंबाला कोणंतही दु:ख द्यायची माझी इच्छा नव्हती. यासगळ्या प्रकाराबद्दल मला तुझी माफी मागायची आहे. यानंतर हरभजन जवळ जवळ रडलाच होता. मी त्याच्याबरोबर हात मिळवले आणि मिठी मारली, असा दावा एन्ड्रयू सायमंड्सनं केला होता. हे कधी झालं? असं पहिलं ट्विट हरभजननं केलं होतं. यानंतर दुसरं ट्विट करत हरभजननं सायमंड्सचे सगळे दावे फेटाळून लावले.