DY Patil T20 Cup 2024 : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज किंबहुना ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या चार महिन्यापासून टीम इंडियामधून बाहेर होता. वर्ल्ड कपमधील दुखापतीमुळे पांड्याला बाहेर बसावं लागल्याने टीम इंडियाला मोठा संकटाला सामोरं जावं लागलं. वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पांड्याची कमतरता दिसून आली. अशातच आता आगामी आयपीएलपूर्वी हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. हार्दिक पांड्या आता डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेत क्रिकेटच्या मैदानात परतलाय. मात्र, मैदानात येताच पांड्याने घोडचूक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेत हार्दिक पांड्या रिलायन्स वन संघाची कॅप्टन्सी सांभाळतोय. त्यासाठी त्याने फिटनेस टेस्ट देखील पार केली आहे. बंगळुरू येथील एनसीएमध्ये  हार्दिक पांड्याने आपली फिटनेस टेस्ट पूर्ण केली. त्यानंतर त्याने रिलायन्स वन संघाकडून खेळण्यासाठी मंजुरी दिली. हार्दिक पांड्यासोबतच  तिलक वर्मा, आकाश मधवाल, नेहल वढेरा आणि पियुष चावला हे खेळाडू देखील रिलायन्सकडून खेळत आहेत. अशातच आता या सामन्यात फलंदाजी करताना हार्दिकने बीसीसीआयचा लोगो असलेलं हेलमेट घातल्याचं पहायला मिळालं.


पांड्या जेव्हा फलंदाजीला आता तेव्हा त्याच्या हेलमेटवर बीसीसीआयचा लोगो होता एवढंच नाही तर त्याखाली तिरंगा देखील होता. मात्र, हार्दिकनं लोगो लपवणं गरजेचं होतं. तुम्हाला माहिती नसेल तर, बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत बीसीसीआयचा लोगो वापरता येत नाही. ज्यावेळी बीसीसीआय संघनिवड करते, तेव्हाच हेलमेटवर बीसीसीआयचा लोगो वापरण्यात येतो. मात्र, हार्दिकने खुलेआम बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.



दरम्यान, तुम्हाला आठवत असेल तर सचिन तेंडूलकर देखील देशांतर्गत सामने खेळायचा तेव्हा त्याने देखील बीसीसीआयचा लोगो लपवला होता. तर अनेक खेळाडू बीसीसीआयचं हेलमेट न वापरता इतर हेलमेटला प्राधान्य देतात. मात्र, आता हार्दिक पांड्याने केलेल्या चुकीला माफी मिळणार की कारवाई होणार? हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.