भारताला मोठा धक्का! हार्दिक पंड्या World Cup मधून बाहेर; `हा` खेळाडू करणार संघात एन्ट्री
Hardik Pandya Ruled Out Of World Cup 2023: हार्दिक पंड्या वर्ल्ड कपच्या सामन्यादरम्यान चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये जखमी झाला होता आणि मैदानातून बाहेर पडला होता.
Hardik Pandya Ruled Out Of World Cup 2023: भारतीय संघ उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खेळण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेमधून बाहेर पडला असून तो वर्ल्ड कप 2023 मधील कोणताही सामना खेळणार नाही. हार्दिकची जागा कोण घेणार हे सुद्धा निश्चित करण्यात आलं आहे.
पंड्याला नक्की झालं काय?
19 ऑक्टोबर रोजी पुण्यात झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये हार्दिक पंड्या जखमी झाला. बांगलादेशविरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्यावर उपचार सुरु करण्यात आले. तो साखळी फेरीमधील सामने खेळणार नाही असं आधी सांगण्यात आलं होतं. मात्र आज तो संपूर्ण स्पर्धेमधूनच बाहेर पडला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान हार्दिक पांड्या संघात नसल्याने संघाचा समतोल राखणं अवघड जात असल्याची चर्चा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्याला इजा झाल्याने त्याला एकही सामना खेळता येणार नाही. मात्र त्याच्या जागी भारतीय संघामध्ये वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.
भारताने पंड्याशिवाय खेळण्याची तयारी ठेवली
तशी भारताने हार्दिक पांड्याशिवाय खेळण्याची मानसिक तयारी ठेवली होती. 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे मैदानात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधीच भारताचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भातील संकेत दिले होते. "हार्दिक पंड्या संघात असला किंवा नसला तरी आम्ही सर्व पर्याय खुले ठेवत आहोत. उद्या जर परिस्थितीची मागणी असेल तर आम्ही तीन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. ते मधील ओव्हर्समध्ये धावांची गती रोखू शकतात. आमच्या फिरकी गोलंदाजांकडे अशा स्थितीत खेळण्याचं कौशल्य आहे," असं रोहित शर्माने सांगितलं होतं.
शमीमुळे भारताचं टेन्शन कमी झालं
"दुखापतीनंतर सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. श्रीलंकेविरोधात सामन्यात तो खेळणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करत आहोत. तो लवकरात लवकर खेळू शकतो," असं रोहित शर्मा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला होता. मात्र पंड्या वर्ल्ड कप स्पर्धेआधी बरा होणार नाही हे आजच्या निर्णयावरुन स्पष्ट झालं असून त्याच्या जागी संघात संधी देण्यात आलेल्या मोहम्मद शमीने भन्नाट कामगिरी केल्याने भारताला फारसं टेन्शन नाही. हार्दिकची जागा घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येक प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का हे येणारा काळच सांगेल.