T20 world cup मध्ये पराभवानंतर आता हा खेळाडू बनणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
T20 World Cup 2022 मध्ये पराभवानंतर बीसीसीआय करणार मोठा बदल. संघाला मिळणार नवा कर्णधार.
मुंबई : टी20 वर्ल्डकप 2022 (T20 world cup 2022) मधून भारतीय संघाचं ( Team India ) वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. टीम इंडियाचा सेमिफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव झाला. त्यामुळे आता भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. टीम इंडिया बाहेर झाल्यानंतर अनेकांनी टीम इंडियाची कमान युवा खेळाडूकडे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता भारतीय क्रिकेट नियमक मंडळ ( BCCI ) टी20 फॉरमॅटसाठी नवा कर्णधार देऊ शकते. वनडे फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार असू शकतो. ( Hardik Pandya will be the next captain of team india for T20 format )
जानेवारीत IND vs SL सीरीज
पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये भारतीय संघाचा सामना श्रीलंका संघासोबत होणार आहे. या सीरीज दरम्यान बीसीसीआय हा बदल करु शकते. श्रीलंकेच्या विरुद्ध तीन टी20 आणि तीन वनडे सामने खेळले जाणार आहे. यासाठी 2 वेगवेगळे कर्णधार असणार आहेत. रोहित शर्माकडे वनडे टीमचं कर्णधारपद कायम राहू शकतं. तर टी20 टीमचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे दिलं जावू शकतं.
वनडे आणि टी20 साठी वेगवेगळे कर्णधार
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी म्हटलं की, 'असं करणं खूप घाईचं ठरु शकतं. पण आम्ही वनडे आणि टी20 साठी वेगवेगळे कर्णधार असावेत का यावर विचार करतोय. कारण यामुळे प्रेशर कमी होऊ शकतं. टी20 क्रिकेटसाठी फ्रेश अप्रोचची गरज आहे. 2023 मध्ये भारतात वनडे वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सातत्य आवश्यक आहे. यावर बैठकीत निर्णय घेतला जाईल.'
हार्दिक पांड्याकडे जबाबदारी?
भारतीय संघाचं कर्णधारपद सध्या रोहित शर्माकडे आहे. पण टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये यश न मिळाल्याने काही बदल केले जावू शकतात. रोहित शर्मा आता 35 वर्षांचा आहे. त्यामुळे पुढच्या टी20 पर्यंत नवीन कर्णधार सेट करावा लागणार आहे. हार्दिक पांड्याकडे टी20 संघाची जबाबदारी सोपवली जात आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंड दौऱ्यासाठी पांड्याला कर्णधार बनवण्यात आलंय. त्यामुळे हार्दिक पांड्याला टी20 चं कर्णधार केलं जावू शकतं.