मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या वागणूकीमुळे डेव्हिड वॉर्नरचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचं विधान माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने केलं आहे. आयपीलएच्या यंदाच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही. यामध्ये सीझनच्या सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर कर्णधार होता मात्र त्याचा खेळ पाहता कॅप्टन्सी काढून केन विलियम्सनला कर्णधार करण्यात आलं. यावर वॉर्नरने नाराजी व्यक्त केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आता यावर ब्रेट लीने देखील वक्तव्य केलं आहे. ली म्हणाला की, "वॉर्नर एक मोठा प्लेयर आहे आणि टी -20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या यशात त्याची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. सनरायझर्सने या वर्षीच्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकलं आणि यूएईमध्ये हंगाम पुन्हा सुरू झाल्यावर पहिल्या दोन सामन्यांमध्ये मध्यम कामगिरीनंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं."


ब्रेट लीला आशा आहे की, ऑस्ट्रेलिया यंदा त्यांचं पहिले टी-20 विश्व विजेतेपद पटकावू शकेल. ऑस्ट्रेलिया शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 


आयसीसीसाठी लिहिलेल्या कॉलममध्ये एका स्तंभात लिहिलंय की, "आम्हाला या स्वरूपात फारसं यश मिळालेलं नाही. आता ते बदलण्याची वेळ आली आहे आणि आमच्याकडे एक संघ आहे जो जेतेपद जिंकू शकतो. हे सोपं होणार नाही, कारण तुम्ही इंग्लंड, भारत आणि न्यूझीलंड टीम किती मजबूत आहेत हे पाहिलंय."


तो म्हणाला, "ऑस्ट्रेलियाची टीम प्रतिभेने भरलेली आहे आणि माझ्या दृष्टीने डेव्हिड वॉर्नर महत्त्वाचा असेल. मी म्हणेन की त्याने आगामी सामन्यांसाठी धावा वाचवून ठेवल्या आहेत. त्याला आयपीएलमध्ये खूप कठोरपणे वागवलं गेलं आणि यामुळे त्याचा आत्मविश्वास काही प्रमाणात डळमळीत झाला आहे. पण तो मोठ्या स्टेजवर चांगली कामगिरी करतो."