हिटमॅन रोहित शर्माचं नशिब बदलवणारा `तो` सामना
त्या संधीनंतर रोहित शर्माने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि जगाला एक स्टार क्रिकेटर मिळाला.
मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. आज ही विरोधी संघ भारतीय सलामीवीर क्रीजवर असतो तोपर्यंत चिंतेत असतो. पण प्रत्येकाची एक कथा असते. प्रत्येकाचा वेळ बदलतो. सर्वकाही लगेचच मिळत नाही. 'हिटमॅन' रोहित शर्मा क्रिकेट विश्वात सुपरस्टार कसा बनला हे जाणून घेऊया.
वास्तविक रोहित 2007 पासून टीम इंडियाचा एक भाग आहे. बर्याच वर्षांपासून रोहित शर्मा आपल्या प्रतिभेला न्याय देऊ शकला नाही. परंतु क्रिकेटमधील एक चांगला सामना नशिब बदलण्याचे काम करतो ही म्हण रोहित शर्मासाठी खरी ठरली. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माला प्रथमच सलामीसाठी पाठवले आणि त्यानंतर क्रिकेट जगाला नवा राजा मिळाला.
रोहितने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 81 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली होती. या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये शिखर धवननंतर रोहितही सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला होता. हिटमनने 2013 च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या 5 सामन्यांमध्ये 177 धावा केल्या होत्या, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्मा या स्पर्धेत मोठी इनिंग खेळू शकला नसला तरी सलामीवीर म्हणून शर्मा ज्या शैलीमध्ये खेळला त्यामुळे आज तो सुपरस्टार बनला. खुद्द रोहित शर्मा यांनी देखील हे मान्य केलं आहे. बर्याच वेळा धोनीने सामन्यात त्याला ओपनिंगला पाठवले. जर असं झालं नसतं तर आद रोहित तितका यशस्वी असता का यावर प्रश्नचिन्ह आहे. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात 3 दुहेरी शतके झळकावली आहेत, जो आतापर्यंतचा विश्वविक्रम आहे. याशिवाय टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड देखील आहे.