मोहाली: ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भारतीय हॉकी संघातील खेळाडू बलबीर सिंग दोसांज यांचे सोमवारी सकाळी मोहाली येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. भारतीय क्रीडाविश्वात ते बलबीर सिंग सिनियर या नावानेही ओळखले जात होते. बलबीर सिंग यांनी १९४८, १९५२ आणि १९५६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. हा काळ भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यामुळे बलबीर सिंग यांच्या जाण्याने या काळाशी असलेला दुवा निखळल्याची भावना क्रीडाविश्वात व्यक्त होत आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांना न्यूमोनियावर तब्बल १०८ दिवस उपचार घेतल्यानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर ८ मे रोजी बलबीर सिंग यांना पुन्हा मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.



बलबीर सिंग हे भारतीय हॉकी संघातील फॉरवर्ड पोझिशनवर (आक्रमण फळी) खेळायचे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पुरूष हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा बलबीर सिंग यांचा विक्रम अजूनही अबाधित आहे.१९५२ साली हेलसिंकी येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात भारताने नेदरलँड्सला ६-१ अशी धूळ चारली होती. त्यात पाच गोल बलबीर सिंग यांचे होते. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपददेखील भूषवले. १९५६ साली मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत ३८ गोल केले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला भारताविरुद्ध एकही गोल करता आला नव्हता. १९७५ साली मलेशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. हॉकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.