कोहलीचं कर्णधारपद गेलं; आता विराट अजून किती काळ खेळणार क्रिकेट?
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमची कामगिरी निराशाजनक राहिली आणि टीम उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचू शकली नाही. या स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर पडल्याने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. तसंच, टी-20 कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा ठरली.
आता टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. रवी शास्त्री म्हणाले की, कोहली आणखी 6-7 वर्षे क्रिकेट खेळू शकतो. कारण त्याला बाहेरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागली आहे.
रवी शास्त्री यांनी सांगितलं की, 'कर्णधार म्हणून तो त्याच्या हक्काला पात्र आहे, त्याने जे मिळवले ते अविश्वसनीय आहे. एक खेळाडू म्हणून जर तुम्ही बाहेरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही बराच काळ खेळू शकता. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आश्चर्यकारक आहे. जर तो असे करत राहिला आणि मला वाटतं की तो ते करत असेल तर त्याला पुढील 6-7 वर्षे खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
रवी शास्त्री म्हणाले, "कोहली हा महान खेळाडू आहे, यात काही शंका नाही. खूप कमी खेळाडू आहेत जे आपल्या आयुष्यात महान खेळाडू बनले आहेत.
आयसीसी स्पर्धा न जिंकण्याबाबत शास्त्री म्हणाले, "ही निराशा आहे, मात्र खेद नाही. कदाचित आम्ही एक नाही तर दोन स्पर्धा जिंकू शकलो असतो, पण अशा गोष्टी घडतात. तुमची सुरुवात चांगली झाली नाही, तर तुम्ही मागे पडू लागता, जसं या वर्ल्डकप घडलं."
दरम्यान विराट कोहली टी-20 संघापाठोपाठ एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोडण्याचा विचार करू शकेल, असं मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ मागील पाच वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढणं शक्य नाही. तसंच कसोटी संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करता यावं यासाठी तो एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडू शकेल, असंही शास्त्री म्हणालेत.