Paris Olympics 2024: पॅरीस ऑलिम्पिकमध्ये 8 ऑगस्ट रोजी टीम इंडियाच्या खात्यात अजून एका कांस्य पदकाची भर पडली आहे. भारतीय हॉकी संघाने स्पेनचा 2-1 ने पराभव करत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. सेमीफायनल सामन्यात जर्मनीने भारताचा 3-2 ने पराभव केल्यानंतर भारताला कांस्य पदकासाठी सामना खेळावा लागला. मात्र या सामन्यात टीम इंडियाने भारतीयांना निराश केलं नाही. भारताने चौथ्यांदा कांस्य पदक जिंकलं अन् ऑलिम्पिकमध्ये 13 वेळा पदक जिंकल्याचा मान पटकावला. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्व भारतीयांची माफी मागितली आहे. 


काय म्हणाला भारतीय कर्णधार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांस्य पदक जिंकल्यानंतर हॉकी टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंह म्हणाला की, कांस्य पदक जिंकणं ही आमच्यासाठी आणि देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ऑलिम्पिक ही एक अशी संधी असते, ज्यासाठी तुम्हाला फार वाट पहावी लागते. आम्ही नेहमी जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरतो. विधीलिखीत आहे ते घडतंय. या ठिकाणी आमचं स्वप्न गोल्ड मेडल जिंकण्याचं होतं, आणि त्यासाठी सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवला. मी सर्वांची माफी मागतो, कारण आम्ही गोल्ड जिंकू शकत होतो. मात्र आम्हाला ते जमलं नाही. 


मला फार अभिमान वाटतोय की आम्ही देशाला कांस्य पदक जिंकवून देऊ शकलो. आम्हाला संपूर्ण देशासाठी आजचा सामना जिंकायचा होता. याशिवाय पीआर श्रीजेशसाठी देखील हा सामना महत्त्वाचा होता आणि त्याच्यासाठीही आम्ही मेहनत घेतली, असंही हरमनप्रीतने सांगितलं आहे.


हरमनप्रीत पुढे म्हणाला की, मी देशातील प्रत्येक व्यक्तीला विनंती करू इच्छितो की, हॉकीला अजून जास्त सपोर्ट करा. मी सर्वांना हे आश्वासन देतो की, 2028 मध्ये आम्ही नक्कीच यापेक्षा चांगला खेळ करू आणि देशासाठी मेडल जिंकू.


52 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपुष्टात


भारतीय हॉकी टीमने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत देशाने हॉकीमधून पदक जिंकण्याची 1972 नंतरची ही पहिलीच वेळ आहे. 1968 च्या मेक्सिको ऑलिम्पिकमध्ये देशाने कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर 1972 म्युनिक ऑलिम्पिकमध्येही या टीमने कांस्यपदकासा गवसणी घातली होती. भारतीय हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये 13 वे पदक जिंकलं असून सर्वात जास्त पदके जिंकणारी टीम आहे.