मुंबई : कॉफी विथ करण शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भारताचा क्रिकेटपटू केएल राहुलने भाष्य केलं आहे. त्या प्रकरणानंतर मी स्वत:च्या चारित्र्यावरच संशय घ्यायला लागलो होतो, असं राहुल म्हणाला. कॉफी विथ करण शोमध्ये महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं बीसीसीआयने निलंबन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जो वाद झाला तो पचवणं कठीण होतं. लोकांनी मला नापसंत करण्याची सवय नाही. पहिला आठवडा १० दिवस मी स्वत:वरच संशय घेत होतो. जे काही लिहिलं जात होतं यानंतर मी खरच खराब चारित्र्याचा माणूस आहे का? असा विचार माझ्या मनात येऊ लागला. त्यावेळी कठीण प्रश्नांचा सामना करायचा नाही म्हणून मी स्वत:ला सगळ्यांपासून लांब ठेवलं. घराच्या बाहेर पडायलाही मी घाबरत होतो. सरावासाठी बाहेर जायचो, परत घरी यायचो आणि प्ले स्टेशनवर खेळायचो', असं राहुलने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.


'भारतीय टीमला असलेल्या ग्लॅमरमुळे तुम्ही कुठून आलात याचा तुम्हाला विसर पडू शकतो. देशासाठी खेळत असताना तुम्ही विचलित होता. तुमचे खरे मित्र कोण आहेत, तुमच्या कुटुंबाचं महत्त्व काय आहे हे तुम्ही विसरून जाता. बऱ्याच कालावधीपासून मी क्रिकेट खेळत होतो. यादरम्यान मला विश्रांतीही मिळाली नाही,' असं राहुल म्हणाला.


'त्या काळामध्ये माझ्यासोबत जे होते, तेच माझे खरे मित्र असल्याची जाणीव मला झाली. तुम्ही त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी बोलता. तुम्ही कोणीच नव्हतात तेव्हा तुमचा संघर्ष त्यांनी बघितलेला असतो. ते तुमची मदत करतात कारण तुम्ही नेमके कोण आहात हे त्यांना माहिती असतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांची नाती तुम्हाला नव्याने कळतात,' अशी प्रतिक्रिया राहुलने दिली.


या सगळ्या वादानंतर राहुलने भारतीय टीम आणि सपोर्ट स्टाफचेही आभार मानले. 'ऑस्ट्रेलियातून जेव्हा मला घरी यावं लागलं, तेव्हा बरेच जणं माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. आम्हीही आयुष्यात चुका केल्या आहेत. या चुकांची शिक्षा आम्हालाही मिळाली आहे. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत', असं भारतीय टीममधल्या खेळाडूंनी सांगितल्याची माहिती राहुलने दिली.


'सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष कर. या सगळ्यापासून लांब राहा', असा सल्ला भारतीय टीममधल्या एका वरिष्ठाने दिल्याचं राहुल म्हणाला.