ICC Rankings : इशान किशनचा धमाका, रोहितला फायदा विराटला फटका
आयसीसीने रँकिंग जाहीर (ICC Rankings) केली आहे.
दुबई : आयसीसीने रँकिंग जाहीर (ICC Rankings) केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या युवा इशान किशनला (Ishan Kishan) मोठा फायदा झाला आहे. किशनने बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. इशानने आतापर्यंत आफ्रिका विरुद्धच्या सुरु असलेल्या (IND vs SA T20I Series) टी 20 मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. याचाच लाभ इशानला झाला आहे. (icc 20 ranking team india ishan kishan allops into top 10 rohit sharma virat kohli r ashwin)
इशानने क्रमवारीत थेट 14 क्रमांकाने उडी घेत टॉप 10 मध्ये एन्ट्री घेतली आहे. यासह इशान 7 व्या क्रमांकावर पोहचला आहे. विशेष म्हणजे इशानने टी 20 पदार्पणाच्या 15 व्या महिन्यातच ही मोठी उपलब्धि आहे. तसेच इशानच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची ही सर्वोच्च रँकिंग आहे.
इशानने 14 मार्च 2021 ला इंग्लंड विरुद्ध अहमदाबादमध्ये टी 20 पदार्पण केलं होतं. तर आता आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये इशानने 7 वं स्थान पटकावलंय. इशानच्या नावावर 689 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
विशेष म्हणजे इशान हा टॉप 10 रँकिंगमध्ये असलेला एकमेव भारतीय आहे. निराशाजनक बाब म्हणजे टी 20 बॉलिंग आणि अष्टपैलू खेळाडूंच्या टॉप 10 मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.
तर दुसऱ्या बाजूला कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहने एका स्थानाने उडी घेतलीय. बुमराह आता 830 रेटिंग्ससह तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्वि दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे.
रोहितला फायदा विराटला फटका
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा टी 20 बॅट्समन रँकिंगमध्ये 17 व्या स्थानी पोहचला आहे. रोहितला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला विराटला 2 स्थानांचं नुकसान झालंय. विराटची 21 व्या स्थानी घसरण झाली आहे.
जो रुट अव्वल स्थानी
इंग्लंडला माजी कर्णधार जो रुटने टेस्ट बॅटिंग रँकिगमध्ये पहिलं स्थान पटकावलंय. रुटन मार्नस लाबुशेनला पछाडत पहिल्या स्थानी झेप घेतलीय. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा 8 व्या तर विराट कोहली 10 व्या स्थानी आहे. दोघांनाही आपलं स्थान कायम ठेवण्यात यश आलंय. तर वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये रोहित चौथ्या आणि विराट तिसऱ्या स्थानी कायम आहेत.