कोरोनाच्या संकटात टी-२० वर्ल्ड कप होणार का? आयसीसीने दिलं उत्तर
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे.
दुबई : जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. कोरोना व्हायरसचा फटका क्रीडा स्पर्धांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेली आयपीएल पुढे ढकलण्यात आली आहे. आयसीसीनेही त्यांच्या वर्ल्ड कप क्वालिफायरच्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपचं भवितव्य आयसीसीला विचारण्यात आलं. तेव्हा स्पर्धा वेळेवर होईल, असं आयसीसीने सांगितलं. १८ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
'कोरोना व्हायरसचा धोका लक्षा घेता आयोजन समिती यंत्रणांसोबत परिस्थितीची पाहणी करत आहे. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार ही स्पर्धा घेण्याची आमची योजना आहे,' अशी प्रतिक्रिया आयसीसीने दिली आहे.
कोरोनाला जागतिक आरोग्य संस्थेने जागतिक साथ म्हणून घोषित केलं आहे. चीनमधून हा व्हायरस जगभरात पसरला. भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११४ वर पोहोचली आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्ण १,६०,००० पेक्षा जास्त आहेत. तर ६ हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.