न्यूयॉर्कचं पीच खेळाडूंसाठी किती सुरक्षित? `या` दोन बड्या घटनेमुळे ICC नाराज, पाहा Video
T20 World Cup New York Pitch : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मागील दोन दिवसात दोन फलंदाजांची बॅट तुटली आहे. त्यामुळे आता आयसीसी देखील नाराज असल्याचं पहायला मिळतंय.
T20 World Cup New York Pitch: एकीकडे आयपीएलमध्ये 20 ओव्हरमध्ये 200 धावा म्हणजे किरकोळ वाटत असताना दुसरीकडे टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भिन्न परिस्थिती पहायला मिळत आहे. 20 ओव्हरमध्ये तगड्या संघांना देखील 120 धावांचं आव्हान पार करताना घाम फुटतोय. त्याला कारण न्यूयॉर्कचं पीच... कधी स्लो बॉल तर कधी अपेक्षेपेक्षा बाऊंसर राहणाऱ्या बॉलमुळे फलंदाजांची दैना उडाल्याचं दिसून येतंय. तर पीचमुळे गोलंदाजांना मोठा फायदा होत असल्याचं दिसतंय. मात्र, न्यूयॉर्कचं पीच खेळाडूंसाठी किती सुरक्षित? असा सवाल विचारला जात आहे. यावर आयसीसीसने देखील आश्चर्य व्यक्त केलंय.
न्यूयॉर्कच्या पीचवर मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवसात दोन फलंदाजांच्या बॅट तुटल्या आहेत. बांगलादेशचा फलंदाज जाकर अलीची बॅट हँडलमधून तुटल्याचं पहायला मिळालं होतं, तर कॅनडाविरुद्ध पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची बॅट तळापासून तुटली. त्यामुळे फलंदाज नाराज झाल्याचं देखील दिसून आलं. पीच अजूनही मुरलेलं नसल्याने फलंदाजांना रफटफ खेळपट्टीवर खेळणं अवघड जातंय. तर गोलंदाजांना पीचमुळे मदत मिळत आहे.
अमेरिकेमध्ये टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी मैदान देखील नव्हतं. सरकारने खेळाला प्रमोट करण्यासाठी कोट्यावधींचा खर्च करून स्टेडियम तयार केलं. यामध्ये न्यूयॉर्कमध्ये तब्बल 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेडमधून तयार करून आणलेल्या पीचला न्यूयॉर्कवर ठेवलं गेलं अन् स्टेडियम तयार करण्यात आलंय. पीच अजूनही परिपक्व नसल्याने अनेक फलंदाजांना खेळताना त्रास होत असल्याचं पहायला मिळतंय.
जसप्रीत बुमराह म्हणतो...
अमेरिकेच्या खेळपट्टीवर अनेक दिग्ग्जांनी आयसीसीवर टीका केली आहे. अशातच आता टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने यावर मोठं वक्तव्य केलं होतं. पीच कंडिशनमुळे जर गोलंदाजांना मदत होत असेल, तर माझी कोणतीही तक्रार नाही, असं वक्तव्य जसप्रीत बुमराहने भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी केलं होतं. टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते, माझ्या रणनीतीवर ठाम राहिल्याने मला फायदा झाला, असंही बुमराहने म्हटलं होतं.