...तर भारत वर्ल्ड कपआधीच पहिल्या क्रमांकावर जाणार
३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.
मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. पण या वर्ल्ड कपच्या आधीच भारतीय टीमला वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे. सध्या आयपीएल सुरु असल्यामुळे वर्ल्ड कपपर्यंत भारत एकही वनडे मॅच खेळणार नाही, तरीही विराटच्या टीमला क्रमवारीत पहिला क्रमांक मिळू शकतो. आयसीसीने क्रमवारी वार्षिक क्रमवारी अपडेट केली आहे. यानंतर भारत टेस्ट क्रिकेटमध्ये आणि इंग्लंड वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. आयसीसीने क्रमवारी अपडेट केल्यामुळे २०१५-१६ मधल्या सीरिजचे निकाल हटवण्यात आले आहेत. तसंच २०१६-१७ आणि २०१७-१८ च्या निकालांच्या ५० टक्के अंकांना सामिल करण्यात आलं आहे.
नव्या वनडे क्रमवारीनुसार भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये फक्त २ अंकांचंच अंतर आहे. इंग्लंडचा आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पराभव झाला तर भारत वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर जाईल. इंग्लंड आयर्लंडविरुद्ध एक वनडे मॅचची आणि पाकिस्तानविरुद्ध ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. वनडे क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवण्यासाठी इंग्लंडला आयर्लंडला १-० ने आणि पाकिस्तानला ३-२ ने हरवावं लागले. आयर्लंडविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला, तर पाकिस्तानविरुद्धची सीरिज ४-१ने जिंकावी लागेल.
टेस्टमध्ये भारत-न्यूझीलंडमधलं अंतर कमी
टेस्ट क्रिकेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असला तरी भारत आणि न्यूझीलंडमधलं अंतर ८ वरून २ अंकांवर आलं आहे. अपडेटआधी भारत ११६ अंकांवर आणि न्यूझीलंड १०८ अंकांवर होते. पण भारताने दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या ३-० विजयाला आणि श्रीलंकेवरच्या २-१ विजयाला २०१५-१६ च्या मोसमाचा हिस्सा मानण्यात आलं. यामुळे भारताला ३ अंक गमवावे लागले, तर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावलेल्या २-० सीरिजचे अंक हटवण्यात आले, त्यामुळे न्यूझीलंडला ३ अंक मिळाले.
ऑस्ट्रेलिया आणखी मागे
या बदलाचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला चौथ्या क्रमांकावर फेकलं आहे. इंग्लंडचे १०५ अंक आहेत, तर ६ अंक गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे ९८ अंक आहेत. २०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलियाने ५ पैकी ४ सीरिज जिंकल्या होत्या, पण सीरिजची गणना करण्यात आली नाही. तर सातव्या क्रमांकावर पाकिस्तान आणि आठव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज आहे. या दोन्ही टीममधलं अंतर ११ अंकांनी घटून २ अंक झालं आहे.