वर्ल्ड कप फायनलमध्ये 6 वर्षानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया भिडणार, किवी इतिहास बदलणार?
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया उद्या (14 नोव्हेंबर) टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (T 20 World Cup 2021) भिडणार आहेत.
मुंबई : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया उद्या (14 नोव्हेंबर) टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (T 20 World Cup 2021) भिडणार आहेत. या फायनलमध्ये दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) फायनलमध्ये आल्याने क्रिकेट विश्वाला नवा विश्व विजेता मिळणार आहे. आतापर्यंत वेस्टइंडिजने सर्वाधिक 2 वेळा तर टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंकाने प्रत्येकी 1 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. या यादीत अंतिम सामन्यानंतर आणखी एका संघाचं नाव जोडलं जाणार आहे. यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ( icc t 20 world cup 2021 final Australia and new zealand meets in 2nd time after 6 years in icc events final)
दोन्ही टीम दुसऱ्यांदा फायनलमध्ये आमनेसामने
दरम्यान दोन्ही संघांची आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची दुसरी वेळ आहे. याआधी हे दोन्ही संघ 2015 च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भिडले होते. मात्र तो 50 ओव्हर्सचा वर्ल्ड कप होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता.तेव्हापासून ऊभयसंघांनी आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.
दोन्ही संघाची टी 20 मधील कामगिरी
टी 20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ एकूण 14 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडवर वरचढ ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने 14 पैकी 9 सामन्यात किवींवर मात केली आहे. न्यूझीलंडने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 सामना हा टाय झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने 5 वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. मात्र एकदाही टी 20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस केन विलियमसनच्या नेतृत्वात पुढे वाटचाल करण्याचा आत्मविश्वास आणखी वाढील लागला आहे.
न्यूझीलंडची टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. जर न्यूझीलंडने हा वर्ल्ड कप जिंकला, तर त्यांच्यासाठी ही सर्वोच्च कामगिरी ठरेल. त्यामुळे या रंगतदार सामन्यात किवी बाजी मारणार, की ऑस्ट्रेलिया इतिहास घडवणार याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.