IND vs WI : भारताने धमाकेदार खेळाच्या बळावर वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका ३-० ने जिंकली. न्यूझीलंड आणि नंतर वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप करून भारताने आयसीसी टी-20 क्रमवारीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इंग्लंड संघाला मागे टाकत टीम इंडियाने पहिलं स्थान गाठलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने वेस्ट इंडिज संघाचा 3-0 ने पराभव करत मालिका जिंकली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने दमदार खेळ दाखवला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेट गमावून 184 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 9 गड्यांच्या मोबदल्यात 167 धावाच करू शकला.


T20 मध्ये टीम इंडिया नंबर वन


गुणांच्या बाबतीत इंग्लंडला मागे टाकत भारताने अव्वल क्रमांक पटकावला आहे. दोन्ही संघांचे रेटिंग सध्या 269 आहे तर भारताचे 10,484 गुण आहेत. इंग्लंडचे भारतापेक्षा 10 गुण कमी आहेत आणि त्यामुळे त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पाकिस्तानचा संघ 266 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे.



सलग दुसरी क्लीन स्वीप


भारताने याआधी घरच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचाही क्लीन स्वीप केला होता. किवी संघाला 3 सामन्यांच्या मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. भारतानेही तीन सामने जिंकून वेस्ट इंडिजचा सफाया केला. भारताने पहिला सामना ६ विकेटने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात 8 धावांनी आणि शेवटच्या T20 मध्ये 17 धावांनी विजय मिळवला.