मुंबई : टी-20 वर्ल्ड कपची तारीख आणि ठिकाणाची घोषणा आयसीसीनं केली आहे. २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. महिला टी-20 वर्ल्ड कप २१ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत होईल तर पुरुषांचा टी-20 वर्ल्ड कप १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत चालेल. ऍडलेड, ब्रिसबेन, कॅनबेरा, जिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या ८ शहरांमध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२० साली होणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये १० महिला टीम आणि पुरुषांच्या १६ टीम सहभागी होतील. महिला आणि पुरुषांच्या विजेत्या टीमला समान रक्कम देण्यात येणार आहे. महिला आणि पुरुषांच्या वर्ल्ड कपची फायनल ऑस्ट्रेलियातलं सगळ्यात मोठं स्टेडियम मेलबर्नमध्ये खेळवण्यात येईल. महिलांची फायनल ८ मार्च २०२० म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी होणार आहे.


टी-20 वर्ल्ड कपच्या घोषणेवेळी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष टीमचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ आणि महिला टीमची कॅप्टन मेग लेनिन उपस्थित होती. आयसीसीनं या दोघांचे फोटो आणि मॅच खेळवण्यात येणाऱ्या शहरांची नावं ट्विट केली आहेत.


मागचा टी-20 वर्ल्ड कप २०१६ साली भारतात झाला होता. या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला ४ विकेट्सनं हरवलं होतं. तर सेमी फायनलमध्ये भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला होता. ही मॅच भारत ७ विकेट्सनं गमावली होती.