देशभरात लागले विजयाचे दिवे, जम्मू ते कन्याकुमारी पर्यंत लोकांचं रस्त्यावर सेलिब्रेशन
Team India win : टीम इंडियाच्या विजयानंतर भारतात दिवाळी आणखी जल्लोषात साजरी केली जात आहे.
मुंबई : भारतानं टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत नेत्रदीपक विजय मिळवला. या विजयात विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं मोलाचा वाटा उचलला. विराटनं 82 रन्सची खेळी केली तर हार्दिक पांड्यानं 40 रन्स केल्या. शेवटच्या बॉलवर 1 रन घेत आर.अश्विननं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. तत्पूर्वी पहिल्यांदा बॅटिंग करत पाकिस्ताननं 20 ओव्हरमध्ये 159 रन्स केल्या होत्या.
भारताच्या विजयानंतर संपूर्ण देशभरात दिवाळी सुरू आहे. क्रीडाप्रेमींनी फटाके वाजवून, झेंडे फडकवून एकच जल्लोष केला. भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी असते. त्यात भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारणं म्हणजे सोने पे सुहागा. सध्या असंच चित्र ऑस्ट्रेलियातही पाहायला मिळतंय. भारतातही सगळीकडे विजयोत्सव सुरू आहे.
नागपूर, पुणे, मुंबईसह राज्यातच नाही तर संपूर्ण देशात विजयाचा हा जल्लोष साजरा करण्यात आला. दिवाळीनिमित्त भारतीय संघाने भारतीय नागरिकांना ही खास भेट दिली आहे. एकीकडे दिवाळीचा उत्साह असताना टीम इंडियाचा भारतावर विजयानंतर हा जल्लोष आणखी दुप्पट झालेला पाहायला मिळतोय. देशभरात लोकं रस्त्यावर येऊन विजयाचं सेलिब्रेशन करत आहेत.