Team India Openers : भारतीय संघाकडे ओपनिंगसाठी आता हे 5 पर्याय उपलब्ध झाले आहेत. BCCI आणि भारतीय संघाचं पुढचं लक्ष्य आता आगामी टी20 वर्ल्डकप असणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करत आहे. पण बदलातून जात असलेल्या टीम इंडियासाठी मजबूत संघ बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा (Rohit sharma)  यााने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात याचा एक नमुना पाहायला मिळाला. 


या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या सलामीवीराची जागा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. रोहितच्या या प्रयोगाकडे टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातूनही पाहता येईल. कारण सध्या टीम इंडिया ओपनिंग बॅट्समननी भरली आहे. दरम्यान, 2022 च्या T20 विश्वचषकात रोहित शर्मासोबत सलामी करताना हे 5 फलंदाज दिसू शकतात.


1 के.एल राहुल (KL rahul)


टीम इंडियाचा उजवा हाताचा फलंदाज के. एल राहुल सलामीवीर म्हणून खूप मारक ठरतो. आयपीएलमध्ये आपल्या जुन्या फ्रेंचायझी पंजाब किंग्ससाठी सलामी करताना ​​राहुलने गोलंदाजांना चांगलंच फटकवलं आहे. 2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध या फलंदाजाने ओपनिंग करताना केवळ 13 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.


राहुल कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. राहुलने ओपनिंग करताना सर्वाधिक सामने खेळले आहेत. जर आपण T20 फॉरमॅटबद्दल बोललो, तर राहुलने भारतासाठी 38 सामन्यांमध्ये 1392 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 15 वेळा अर्धशतकांचा टप्पा ओलांडला आहे.


2. इशान किशन (ishan kishan)


झारखंडचा डावखुरा फलंदाज इशान किशन हा युवा खेळाडूंच्या यादीत सर्वात प्रभावशाली खेळाडू आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा इशान त्याच्या धडाकेबाज फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो. इशानने आयपीएल कारकिर्दीत 61 सामन्यात 9 अर्धशतकांसह 1452 धावा केल्या आहेत. 


उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई फ्रँचायझीने पुन्हा एकदा या युवा फलंदाजाचा आयपीएल 2022 मेगा लिलावात 15 कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केला आहे. इशान किशन सध्या टीम इंडियाचा भाग आहे आणि त्याने सलामीवीर म्हणून 5 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 126 धावा केल्या आहेत. किशनच्या कारकिर्दीची नुकतीच सुरुवात होत आहे, टी20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियासाठी सलामीसाठी ईशान किशनची पहिली पसंती असू शकते.


3. ऋषभ पंत (Rishabh pant) 


डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची फलंदाजीची शैली अतिशय अनोखी आहे. 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने भारतासाठी सलामी दिली नसली तरी प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर फेकण्याची त्याची क्षमता आहे. आतापर्यंत त्याने मर्यादित षटकांमध्ये केवळ 4 आणि 5 क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण नुकत्याच संपलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंत एका सामन्यात डावाची सुरुवात करताना दिसला. 


ऋषभ पंतच्या T20 आकड्यांबद्दल बोलायचे झाले तर, IPL मध्ये त्याने 84 सामन्यात 147 च्या स्ट्राईक रेटने 2498 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पंतने 43 सामन्यांत 683 धावा केल्या आहेत.


4. ऋतुराज गायकवाड ​(Ruturaj Gaikwad) 


ऋतुराज गायकवाड हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग आहे. गेल्या 2 हंगामात ऋतुराजने टी-20 फॉरमॅटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या मोसमात या युवा फलंदाजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅपही जिंकली. महाराष्ट्राच्या या खेळाडूने अल्पावधीतच भारतीय समर्थकांना वेड लावले आहे.


चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचे चौथे विजेतेपद मिळवून देण्यात ऋतुराज गायकवाडचा मोलाचा वाटा होता. आतापर्यंत त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 22 सामन्यांमध्ये 839 रन केले आहेत. ज्यामध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांचाही समावेश आहे. अशा उत्कृष्ट आकड्यांसह, ऋतुराज टी-20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियासाठी सलामीवीर म्हणून खेळताना दिसू शकतो.


5. व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) 


उजव्या हाताचा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा सलामीवीर म्हणूनही उपयोग होऊ शकतो. वेंकटेश अय्यरने आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून सलामी करताना भरपूर धावा केल्या आहेत. वेंकटेश अय्यरने मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यात येऊन स्पर्धेतील आपल्या फ्रेंचायझीचे नशीब बदलले. KKR आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात पोहोचला. अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्यात या फलंदाजाने 32 चेंडूत 50 धावा करत आपले कौशल्य दाखवले.


व्यंकटेश अय्यरने आयपीएलचे केवळ 10 सामने खेळले, ज्यात त्याने 41 च्या सरासरीने 370 धावा केल्या. यानंतर व्यंकटेशने विजय हजारे ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला टीम इंडियात संधी देण्यात आली. मात्र आतापर्यंत त्याला टीम इंडियात सलामीवीर म्हणून संधी देण्यात आलेली नाही. पण क्रमवारीत फलंदाजी करतानाही व्यंकटेश अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे.