आयसीसी टेस्ट क्रमवारीची घोषणा
आयसीसीनं टेस्ट क्रिकेटची नवी क्रमवारी जाहीर केली आहे.
दुबई : आयसीसीनं टेस्ट क्रिकेटची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या, इंग्लंडचा कर्णधार जो रूट तिसऱ्या आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा सहाव्या क्रमांकावर आहे. स्मिथ बरोबरच निलंबन झालेला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर या क्रमवारीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ३५६ रन करणारा दिमुथ करुणारत्नेनं सातव्या क्रमांकावर झेप घेतली. करुणारत्नेनं या सीरिजमध्ये १५८ नाबाद, ६०, ५३ आणि ८५ रनची खेळी केली.
बॉलरच्या यादीमध्ये कागिसा रबाडाची पहिल्या क्रमांकाची जागा इंग्लंडचा बॉलर जेम्स अंडरसननं घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये रबाडाला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. याचा फटका त्याच्या क्रमवारीलाही बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराजनं सीरिजमध्ये १६ विकेट घेतल्या. यातल्या १२ विकेट त्यानं दुसऱ्या टेस्टमध्येच घेतल्या. ज्यात पहिल्या इनिंगमधल्या ९ विकेटचा समावेश आहे. या कामगिरीचा केशव महाराजलाही फायदा झाला. केशव महाराज आता बॉलरच्या क्रमवारीमध्ये १८व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा स्पिनर रवींद्र जडेजा तिसऱ्या आणि अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेविरुद्धची सीरिज गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका ११२ पॉईंट्सवरून १०६ पॉईंट्सवर आली आहे. पण क्रमवारीमध्ये आफ्रिकेची टीम दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काही अंश पॉईंट्सचा फरक आहे. टीमच्या क्रमवारीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडविरुद्धची सीरिज भारत ५-०नं हरला तरीही भारत पहिल्या क्रमांकावर कायम राहिल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये विजय मिळवला तरी श्रीलंकेची टीम सहाव्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंड आणि श्रीलंकेच्या टीमचे १०६ पॉईंट्स असले तरी काही अंशांच्या फरकामुळे इंग्लंड पाचव्या क्रमांकावर आहे.