ICC Test Ranking 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी कसोटी क्रिकेटमधील खेळाडूंच्या सुधारित रँकिंगची (ICC Test Ranking) जाहीर केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर (WTC Final) आधीच्या रॅकिंगमध्ये बरेच बदल झाले आहेत. भारतीय कसोटी संघामध्ये तब्बल दीड वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेनं फलंदाजांच्या यादीमध्ये मोठी झेप घेतली असून 37 वं स्थान पटकावलं आहे. तर शार्दुल ठाकूरनेही 94 वं स्थान पटकावलं आहे. तसेच या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये 39 वर्षानंतर पहिल्यांदाच एक ऐतिहासिक घटना घडली आहे.


39 वर्षानंतर पहिल्यांदाच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 39 वर्षानंतर पहिल्यांदाच एकाच संघातील 3 खेळाडू या यादीत अव्वल स्थानी आले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघातील 3 खेळाडूंनी फलंदाजांच्या यादीमध्ये पहिली तिन्ही स्थानं पटकावली आहेत. पहिल्या स्थानी मार्नस लाबुशेन असून दुसऱ्या स्थानावर ओव्हलच्या मैदानात शतक झळकावणारा स्टीव स्मिथ आहे. या दोघांचा संघ सहकारी ट्रेविस हेड हा तिसऱ्या स्थानी आहे. लाबुशेनचे एकूण 903 गुण आहेत. भारताविरुद्ध 121 धावांची खेळी करणाऱ्या स्मिथनं तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर याच सामन्यातील दुसरा शतकवीर ट्रेविस हेडने 3 स्थानांनी झेप घेत तिसरं स्थान पटकावलं आहे. त्याने भारताविरुद्ध पहिल्या डावात 163 धावांची खेळी केली होती.


यापूर्वी कधी झालं होतं असं?


लाबुशेन, स्मिथ आणि हेडच्या निमित्ताने एकाच वेळी एकाच संघातील 3 खेळाडू अव्वल असण्याचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. यापूर्वी 1984 मध्ये असं वेस्ट इंडीजच्या फलंदाजांसंदर्भात घडलं होतं. त्यावेळी गॉर्डन ग्रीनिज (810 गुण), क्लाइव लॉएड (787 गुण) आणि लॅरी गोम्स (773 गुण) या तिघांनी पहिली 3 स्थानं पटकावली होती. 


...टॉप 10 मध्ये एकमेव भारतीय


विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप न खेळलेला आणि मागील 6 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात पाऊलही न ठेवलेला ऋषभ पंत हा टॉप 10 खेळाडूंमध्ये आहे. पंत 758 गुणांसहीत दहाव्या स्थानी आहे. फलंदाजांच्या यादीमध्ये रोहित शर्मा 12 व्या तर विराट कोहली 13 व्या स्थानी आहेत.



गोलंदाजांच्या यादीत अश्वीनच अव्वल


गोलंदाजांच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लियोनला 2 स्थानांचा फायदा झाला असून तो 6 व्या स्थानी पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅण्डला 5 स्थानांचा फायदा झाला असून तो 36 व्या स्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न खेळलेला भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा टेस्ट गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. नवव्या स्थानी रविंद्र जडेजा आहे. जुलै 2022 पासून जखमी असलेला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या यादीत 2 स्थानांनी घसरला असून तो 8 व्या स्थानी आला आहे.