ब्लोमफॉनटेन : अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताने नवख्या जपानला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने ही मॅच १० विकेटने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी भारताने या स्पर्धेतल्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये श्रीलंकेचा पराभव केला होता. जपानने दिलेलं ४२ रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने ४.५ ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता केला. यशस्वी जयस्वालने २९ नाबाद आणि कुमार कुशाग्राने नाबाद १३ रनची खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४२ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओपनर जयस्वाल आणि कुशाग्राने ३४ रन बाऊंड्री मारूनच केल्या. यामध्ये ७ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार प्रियम गर्गने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताच्या बॉलरनी जपानला सुरुवातीपासून धक्के दिले. रवी बिश्नोईने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर कार्तिक त्यागीला ३, आकाश सिंगला २ आणि विद्याधर पाटीलला १ विकेट मिळाली. 


जपानविरुद्धच्या विजयानंतर भारताचा कर्णधार प्रियम गर्गने भारताच्या बॉलरचं कौतुक केलं. टीमच्या कामगिरीमुळे खुश आहे. स्पिनरनी चांगली कामगिरी केली, पण फास्ट बॉलरची लाईन आणि लेंथ आणखी सुधारु शकेल. आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, असं गर्ग म्हणाला.