VIDEO: धोनीशी पंगा नको! आयसीसीचा इशारा
न्यूझीलंडविरुद्धच्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला.
वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला. शेवटच्या मॅचमध्ये कठीण परिस्थितीमध्ये असतानाही भारतानं विजय मिळवला. या मॅचमध्ये भारताचा विकेट कीपर धोनीची चपळता पुन्हा एकदा दिसली. भारतानं ठेवलेल्या २५३ रनचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या आशा जिमी निशमवर होत्या. पण धोनीनं निशमला रन आऊट करून न्यूझीलंडचा विजयाचा घास ओढून घेतला.
२६व्या ओव्हरमध्ये स्कोअर १०६ रन असताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आऊट झाला. यानंतर जिमी निशम बॅटिंगला आला. टॉम लेथम आणि कॉलिन डि ग्रॅण्डहोमही लवकर आऊट झाल्यामुळे न्यूझीलंडचा स्कोअर १३५/६ असा झाला. यानंतर जिमी निशमनं मिचेल सॅण्टनरच्या साथीनं ४१ रनची भागीदारी केली आणि पुन्हा एकदा न्यूझीलंडला मॅचमध्ये आणलं. याचवेळी धोनीनं निशमला रनआऊट करून मॅच पलटवली.
३७व्या ओव्हरमध्ये केदार जाधवच्या बॉलिंगवर निशमच्या एलबीडब्ल्यूसाठी अपील करण्यात आलं. अंपायरनं निशमला नॉट आऊट दिलं. या गोंधळामध्ये जिमी निशम बॉल कुठे आहे ते बघायला विसरला. जिमी निशमनं क्रीज सोडलेली बघितल्यावर धोनीनं क्षणाचाही विलंब न लावता स्टम्पला बॉल मारला. यामुळे जिमी निशम रन आऊट झाला.
धोनीच्या या रनआऊट नंतर आयसीसीनंही खेळाडूंना इशारा दिला आहे. धोनी स्टम्पच्या मागे उभा असताना क्रीज सोडू नका, असं ट्विट आयसीसीनं केलं आहे.
धोनीच्या काही चाहत्यांनी धोनीनं १० वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्येच केलेल्या एका रन आऊटच्या व्हिडिओची आठवण करून दिली आहे. #10YearChallenge असं म्हणत धोनीच्या चाहत्यानं त्याचे दोन्ही रन आऊटचे व्हिडिओ ट्विट केले आहेत.
या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या भारतानं १० ओव्हरमध्ये १८ रनवर ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर अंबाती रायुडूच्या ९० रन आणि हार्दिक पांड्याच्या जलद खेळीमुळे भारताला २५२ रनपर्यंत मजल मारता आली. २५३ रनचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा २१७ रनवर ऑल आऊट झाला. याचबरोबर भारतानं वनडे सीरिज ४-१नं जिंकली. याआधी भारतानं न्यूझीलंडमध्ये कोणत्याही वनडे सीरिजमध्ये ४ विजय मिळवले नव्हते.