कसोटी रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर 1 नाहीच, ICC च्या चुकीमुळे संभ्रम
ICC ची वेबसाईट गंडली अन् टीम इंडिया नंबर 1 बनली, पण काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं... नेमकं काय घडलं?
Team India ICC Test Ranking : आयसीसीने नुकतीच कसोटी संघाची क्रमवारी घोषित केली होती. यामध्ये दिसून आलं की टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात पहिल्या स्थानी झेप घेतली. ऑस्ट्रेलिया संघाची (Australia Team) दुसऱ्या स्थानी घसरण झालेली दिसून आली. (Team India ICC Test Ranking) सर्वांना प्रश्न पडला की टीम इंडिया नेमकी कशाच्या जोरावर पहिल्या स्थानी आली. अनेक माध्यमांनी तशा बातम्याही केल्या मात्र काही वेळातच आयसीसीने आपली चुक सुधारली. (ICC website Erro and team India became number 1 latest marathi Sport News)
नेमकं काय झालं?
आयसीसीने जी क्रमवारी घोषित केली होती त्यामध्ये टीम इंडिया 32 सामन्यांमध्ये 3690 गुण आणि 115 रेटिंगसह पहिल्या स्थनी दाखवत होतं. ऑस्ट्रेलिया संघ 29 सामन्यांमध्ये 3231 गुण आणि 111 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर होता. टीम इंडियाने नेमकं कोणत्या प्रदर्शनाच्या जोरावर पहिलं स्थान मिळवलं याबद्दल अधिकृत असं कोणालाच माहिती नव्हती.
माध्यमांनी तर्क-वितर्क लावायला सुरूवात केली, यामध्ये काहींच्या म्हणण्यानुसार भारताने बांगलादेश आणि श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला होता. अनुक्रमे दोन्ही मालिकांमध्ये भारताने 2-0 ने विजय मिळवला होता. तर आताच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील तीन कसोटी सामन्यांमधील तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे ड्रॉ करण्यात आला होता. याचा फटका ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसल्याचा अंदाज बांधला गेला.
दुसरी गोष्ट म्हणजे टीम इंडियाने पहिलं स्थान मिळवल्यावर बीसीसीआय ना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. सोशल मीडियावर काहींनी आयसीसीची वेबसाईटवर आलेली क्रमवारी पाहून यासंदर्भातील पोस्ट केल्या. मात्र काही वेळाने आयसीसीने आपली चुक सुधारली.
दरम्यान, आताच्या ताज्या क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलिया 126 रेटिंगसह पहिल्या स्थानावर, भारत 115, इंग्लंड 107, दक्षिण आफ्रिका 102 आणि पाचव्या क्रमांकावर 99 रेटिंगसह न्यूझीलंडचा संघ आहे.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (ICC World Test Championship) ऑस्ट्रेलियाने आपलं स्थान निश्चित केलं आहे. अद्याप भारताच्या स्थानाबाबत अनिश्चितता असून ऑस्ट्रेलियाविरूद्ध्या मालिकेनंतर हे चित्र स्पष्ट होईल.